शीना बोरा हत्याकांड - इंद्राणी, पीटरने दिला शीनाचा फोन नंबर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी सहा वर्षांपूर्वी त्यांच्या एका नातेवाइकाच्या तपासासाठी मला मोबाईल क्रमांक दिला होता; मात्र नंतर संबंधित नातेवाईक सापडल्याने तपास थांबविण्याबद्दलही त्यांनी सांगितले होते, अशी जबानी सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी विशेष न्यायालयात दिली. शीना ही 2012 पासूनच गायब झाली होती. 

शीना बोरा हत्येच्या खटल्यामध्ये सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती जे. सी. जगदाळे यांच्यापुढे भारती यांचा जबाब नोंदविण्यात आला. मुखर्जी यांनी शीनाचा मोबाईल क्रमांक दिला होता. या मोबाईलचा पत्ता शोधण्यास सांगितले होते. मात्र, तो क्रमांक शीनाचा आहे हे मला तीन वर्षांनंतर 2015 मध्ये समजले, असा दावाही भारती यांनी केला. 

परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयामध्ये 2002 ते 2005 या कालावधीत काम करीत असताना आपली इंद्राणी आणि पीटर यांच्याबरोबर ओळख झाली होती. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा भेट झाली, असेही भारती यांनी स्पष्ट केले. शीना बोरा हत्याकांड उघड झाल्यावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या वेळेस तेथे जबाब नोंदविण्यासाठी गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले. तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारियाही त्या वेळी सोबत होते. तेव्हा पोलिसांकडे असलेला क्रमांक आणि मला दिलेला क्रमांक हा एकच असल्याचेही लक्षात आले आणि याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनाही दिली होती, असेही ते म्हणाले. मंगळवारी त्यांची उलटतपासणी होणार आहे. शीना ही एप्रिल 2012 पासून गायब झाली होती आणि तिच्या मृतदेहाचे अवशेष 2015 मध्ये पेणजवळील जंगलात पोलिसांना सापडले होते. या खटल्यात भारती हे सहावे साक्षीदार आहेत. 

Web Title: mumbai news Sheena Bora massacre