मेंडोन्सांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

भाईंदर - मिरा-भाईंदरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिल्बर्ट मेंडोन्सा अखेर शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बळ मिळणार असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जोरदार झटका बसेल, असे बोलले जाते. त्याचप्रमाणे शिवसेनेतील स्थानिक समीकरणे बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

भाईंदर - मिरा-भाईंदरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिल्बर्ट मेंडोन्सा अखेर शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बळ मिळणार असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जोरदार झटका बसेल, असे बोलले जाते. त्याचप्रमाणे शिवसेनेतील स्थानिक समीकरणे बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

गिल्बर्ट मेंडोन्सा, त्यांच्या कन्या आणि मिरा-भाईंदरच्या माजी महापौर कॅटलीन परेरा व अन्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २०) वांद्रे येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. मेंडोन्सा यांचा शिवसेनेतील प्रवेश आमदार प्रताप सरनाईक यांच्यामुळे रखडल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेला आता ‘स्वल्पविराम’ मिळाला आहे. 

मागील महापालिका निवडणुकीत सरनाईक यांच्या परिश्रमांच्या बळावर शिवसेनेने मेंडोन्सा यांच्याशी झुंज देत सहावरून १४ जागांची मजल गाठली होती. तेच मेंडोन्सा आता सहपरिवार शिवसेनेत दाखल झाले आहेत. मेंडोन्सा यांचा शिवसेना प्रवेश लांबल्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. मेंडोन्सा यांनी वांद्रे येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘शिवबंधन’ बांधून घेतले. त्यांच्या कन्या आणि माजी महापौर कॅटलीन परेरा, हेलन जॉर्जी, व्हेंचर मेंडोन्सा, बर्नार्ड डिमेलो, भगवती शर्मा आदी कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले. या वेळी मंत्री शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर उपस्थित होते. 

राष्ट्रवादी, भाजपला धक्का
मेंडोन्सा यांच्या प्रवेशामुळे भाईंदरमध्ये शिवसेनेची स्थिती भक्कम झाली आहे. भाईंदर पश्‍चिमेकडे त्यांचा दबदबा असल्याने शिवसेनेला राजकीय फायदा होईल, असे बोलले जाते. मेंडोन्सा तुरुंगात असताना भाजपमध्ये गेलेले त्यांचे समर्थकही आता शिवसेनेत दाखल होण्याची तयारी करत असल्याचे समजते.

Web Title: mumbai news shiv sena