शिवसेनेत आदित्योदय !

शिवसेनेत आदित्योदय !

मुंबई - राज्यात तसेच राज्याबाहेर जम बसविण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नव्या टीमची मंगळवारी घोषणा करण्यात आली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अपेक्षेप्रमाणे नेतेपदी बढती देण्यात आली आहे. प्रस्थापितांचा विरोध डावलून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातही नेतेपदाची माळ घालण्यात आली आहे. ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना अनपेक्षितपणे पक्षाचे सचिव करण्यात आले आहे. पक्षाच्या नेतेपदी प्रथमच मुंबई-ठाण्याबाहेरील चेहऱ्यांना संधी देतानाच संघटकपदी अमराठी पदाधिकाऱ्यांची निवड करून राज्याबाहेर वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्नही पक्षाने केला आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची अपेक्षेप्रमाणे फेरनिवड करण्यात आली. ठाकरे यांनी नार्वेकर यांना अंतर दिल्याची चर्चा होती; मात्र त्यांचा पक्षाचे सचिवपद देऊन ठाकरे यांनी सर्वांना धक्का दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शिवसेनेत एवढे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने ‘टीम उद्धव’ असल्याचे मानले जाते.

राज्याबाहेरील सर्व निवडणुका लढविण्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटकपदावर हेमराज शहा, अखिलेश तिवारी, विनय शुक्‍ला, गुलाबचंद दुबे, अण्णा मलाई या अमराठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. रवींद्र कुवेस्कर, गोविंद घोळवे यांचीही संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अनिल परब पक्षाचा नवा आवाज
ठाकरे यांचे निकटवर्ती ॲड. अनिल परब यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते आहेत. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अरविंद सावंत, मनीषा कायंदे यांच्यावरही प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपनेतेपदी विठ्ठलराव गायकवाड यांच्या सर कामगार संघटनेतील रघुनाथ कुचिड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नेतेपद प्रथमच ग्रामीण भागांकडेही
शिवसेनेच्या नेतेपदी यंदा प्रथमच मुंबई-ठाण्याबाहेरील नेत्यांची निवड झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री अनंत गिते, औरंगाबादचे  खासदार चंद्रकांत खैरे, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड झाली आहे. युवासेनेचे सूरज चव्हाण यांची सचिवपदी नियुक्ती करत पक्षाने संघटनेत तरुणांनाही स्थान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com