मते फुटण्याच्या भीतीमुळे भाजपसमवेत जाण्याचा पर्याय 

मते फुटण्याच्या भीतीमुळे भाजपसमवेत जाण्याचा पर्याय 

मुंबई - राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडे कोणताही पर्याय नसल्याने भाजपने पुढे केलेल्या रामनाथ कोविंद या नावाला समर्थन देणे हा सद्यःस्थितीतला सर्वोत्तम निर्णय असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. या निवडणुकीतील मतदानासाठी कोणताही "व्हिप' लागू होत नसल्याने मते फुटतील हे लक्षात घ्यायला हवे, असे उद्या (मंगळवार) होणाऱ्या बैठकीत पक्षनेतृत्वाला सांगणार असल्याचे समजते. 

शिवसेना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळी भाषा तेवढी वापरते; पण अंतिमतः ते आमच्या समवेत असतील, असा विश्‍वास भाजप गोटातून व्यक्‍त केला जातो आहे. मात्र, त्याच वेळी "शिवसेना शेतकरी आंदोलनात आग ओतण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा बंदोबस्त करावा लागेल,' अशी निर्वाणीची भाषाही भाजपमधील एक गट करतो आहे. "सध्या "एनडीए'चा घटकपक्ष असलेला शिवसेना हा एकमेव आक्रमक पक्ष आहे, त्याचा आता इलाज करा,' अशी संतप्त भावना भाजपमधील ज्येष्ठांपर्यंत पोचवली जात आहे. 

""भाजप महाराष्ट्रातील सत्ता शिवसेनेच्या पाठिंब्याविना टिकवू शकतो. अल्पमतातील सरकार चालवणे किंवा शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदार फोडणे केंद्रातील सत्तेमुळे भाजपला शक्‍य आहे. नव्या अवतारातील भाजपचे धोरण अत्यंत आक्रमक असल्याने, पर्यायी नाव उमेदवार म्हणून उपलब्ध नसल्याने शांत राहावे,'' असे मत शिवसेनेचे मंत्री तसेच प्रमुख नेते खासगीत व्यक्‍त करीत आहेत. त्यातच शिवसेनेच्या धोरणाला कंटाळून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाल्यास मते फोडणाऱ्यांची व्यूहरचना आखतील अशी शिवसेनेला भीती आहे. शिवसेनेचे 23 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगण्यास भाजपने प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराचे काम मंजूर करतात. त्यामुळे मनात आणल्यास या आमदारांच्या मतांची भर ते घालतील, असे शिवसेनेत मानले जाते. त्यामुळेच दलित उमेदवाराला विरोध करण्याऐवजी या नावाला मान्यता द्यावी, असे काही ज्येष्ठ नेते सांगणार आहेत. त्यातच उद्धव ठाकरे शिवसेनेतील जुना अंगार तेवता राहावा यासाठी आक्रमक भाषा तेवढी वापरतात. दोन दिवसांनी ते आम्हाला नक्‍कीच पाठिंबा देतील, असा विश्‍वास एका भाजप नेत्याने व्यक्‍त केला. 

"मुदतपूर्व'चा लाभ शिवसेनेला? 
कर्जमाफीची मागणी लावून धरली तर शेतकरी शिवसेनेच्या पाठीशी उभे रहातील असा विश्‍वास शिवसेनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांना आहे. मुदतपूर्व निवडणुकीत सरकारविरोधातील असंतोषाचा लाभ शिवसेनेला मिळू शकेल, अशी शिवसैनिकांची धारणा आहे. संपूर्ण कर्जमुक्‍ती हा आग्रह शिवसेनेला सत्तेपर्यंत नेऊ शकेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगण्यात येत असल्याचे समजते. 

भाजपला पाठिंब्याचा विश्‍वास 
दरम्यान, शिवसेना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देईल, असा विश्‍वास आहे. या संबंधातील चर्चा सकारात्मक झाली असल्याचा दावा एका नेत्याने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com