शिवसेनेचा महागाईविरोधात लवकरच महामोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - वाढलेले इंधन दर आणि महागाई विरोधात सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाच आता रस्त्यावर उतरणार आहे. नवरात्रीत शिवसेनेची महिला आघाडी भाजप विरोधात महामोर्चा काढणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी रविवारी (ता. 17) दिली. 

मुंबई - वाढलेले इंधन दर आणि महागाई विरोधात सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाच आता रस्त्यावर उतरणार आहे. नवरात्रीत शिवसेनेची महिला आघाडी भाजप विरोधात महामोर्चा काढणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी रविवारी (ता. 17) दिली. 

महागाईविरोधातील आंदोलनाच्या तयारीची बैठक रविवारी शिवसेना भवनात झाली. महागाईच्या प्रश्‍नावर भाजपला घेरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यासाठी आज शिवसेना भवनात महिला आघाडीची बैठक झाली. या बैठकीत नवरात्रीतच भाजप विरोधात एल्गार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आंदोलनाचा दिवस ठरवण्यात येईल, असे शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सांगितले. महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा निघेल, असेही राऊत यांनी सांगितले. 

महागाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. राज्यातही आंदोलन होऊ लागले आहेत. भारनियमनाने महागाईच्या आगीत अधिकच तेल घातले आहे. भारनियमानावरूनही राजकीय आंदोलने होणार आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेनेही भाजपला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने राज्यभर घंटानाद आंदोलन केले होते. त्यानंतर आता महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.

Web Title: mumbai news shiv sena inflation