शिवसेनेची महापौरपदासाठीची वाट बिकट 

शिवसेनेची महापौरपदासाठीची वाट बिकट 

नवी मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावून महापौरपद मिळविण्याची शिवसेनेची वाट बिकट ठरण्याची शक्‍यता आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खबरदारी म्हणून व्हीप जारी करण्याची शक्‍यता असून, व्हीप झुगारून नगरसेवकपद धोक्‍यात घालण्याची हिंमत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून दाखविण्याची शक्‍यता तूर्त कमी आहे. तर या फॉर्म्युल्यापुढे शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण फिके पडणार असल्याने पुन्हा महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच महापौर विराजमान होण्याची शक्‍यता आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या 111 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 52 नगरसेवकांची फौज आहे. त्यात पाच अपक्ष व 10 कॉंग्रेस नगरसेवकांच्या समर्थनामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे बहुमत आहे. त्या तुलनेत शिवसेनेकडे 38 व भाजपकडे 6 अशी युतीकडे 44 नगरसेवकांची ताकद आहे. कॉंग्रेसमधील एका नाराज नगरसेविकाच्या बळावर स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत करिष्मा घडवित शिवसेनेने सभापतिपद खेचून आणले होते. मात्र, या फॉर्म्युल्याच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून कोट्यवधींची प्रलोभने देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते; परंतु महापालिकेत उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सहजासहजी फोडाफोडीचे राजकरण करून देईल, असे चित्र दिसत नाही. 

स्थायी समितीच्या निवडणुकीत तोंड भाजल्यानंतर आपले नगरसेवक फुटू नयेत, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हीपची ढाल पुढे केली जाण्याची शक्‍यता अधिक आहे. हात वर करून होणाऱ्या महापौरपदाच्या ऐन निवडणुकीत कोणी गैरहजर अथवा विरोधात मतदान करू नये, यासाठी व्हीप जारी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अशातच विरोधात मतदान केल्यास अथवा गैरहजर राहिल्यास नगरसेवकांचे स्वतःचे पद धोक्‍यात येणार आहे. राजीनामा दिल्यास पुन्हा निवडणुकीत यश मिळेल, याची शंभर टक्के खात्रीही नाही. त्याचबरोबर अपक्ष नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे गटस्थापना करताना राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच एकत्र गट स्थापन केल्याने त्यांचाही परतीचा मार्ग बंद झाला आहे. शिवाय नवी मुंबईतील शिवसेनेला नेता नसल्याने ऐरोलीतील नेत्याच्या नेतृत्वाखाली येऊन काम करण्यास अनेकांच्या पसंतीचे नाही. 

कॉंग्रेसला उपमहापौरपदच! 
राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ शिवसेनेची नजर कॉंग्रेसच्या 9 नगरसेवकांवर आहे. परंतु शिवसेनेला पाठिंबा देऊन आघाडी धर्म तोडणे कॉंग्रेसला परवडणारे नाही. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतरही, कॉंग्रेसच्या वाट्याला उपमहापौरपदच येणार आहे. त्यापेक्षा राष्ट्रवादीसोबत राहून आणखी काही गोष्टी पदरात पाडून घेणे कॉंग्रेसच्या फायद्याचे ठरणार आहे. 

त्यांचेच नगरसेवक संपर्कात 
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 18 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून खासगीत सांगितले जात आहे. मात्र, आमचे नगरसेवक कोणाच्या संपर्कात नसून उलट त्यांचेच नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर कोण कुठे आहे, हे स्पष्ट होईल. 
- अनंत सुतार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com