कॉंग्रेस - शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

रविवारी दुपारी चेंबूर युवक कॉंग्रेसच्या वतीने राहुल शेवाळे यांच्या ईस्टर्न कोर्ट कार्यालयावर भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली चेंबूरमध्ये फिरून शेवाळे यांच्या कार्यालयासमोर आली असता, युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीची दखल घेत शेवाळे यांच्या कार्यालयात सकाळपासूनच जमा झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या घोषणाबाजीला चोख प्रत्युत्तर दिले

चेंबूर - भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याच्या निषेधार्थ चेंबूर युवक कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (ता. 15) खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी शेवाळे यांच्या कार्यालयात सकाळपासूनच उपस्थित असलेले शिवसेना व कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पनवेल - सायन मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

डाळी, धान्य, पेट्रोल, गॅसचे भाव भाजप व शिवसेनेच्या काळात गगनाला भिडले आहेत. भाजप व मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेविरोधात कॉंग्रेस सर्वत्र निदर्शने करीत असताना रविवारी दुपारी चेंबूर युवक कॉंग्रेसच्या वतीने राहुल शेवाळे यांच्या ईस्टर्न कोर्ट कार्यालयावर भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली चेंबूरमध्ये फिरून शेवाळे यांच्या कार्यालयासमोर आली असता, युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीची दखल घेत शेवाळे यांच्या कार्यालयात सकाळपासूनच जमा झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या घोषणाबाजीला चोख प्रत्युत्तर दिले.

दक्षिण मध्य मुंबई युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अभिषेक मेस्री यांनी पक्षाच्या वतीने राहुल शेवाळे यांना निवेदन द्यायचे असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी युवक कॉंग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना भेटण्याची विनंती केली. परंतु, जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध करून कॉंग्रेसविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे पनवेल - सायन मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी युवक, महिलांना धकाबुक्की करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण अधिक चिघळू नये म्हणून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना पांगविले.

Web Title: mumbai news: shivsena congress