उपऱ्या नगरसेवकांमुळे शिवसेनेचे भूमिपुत्र नाराज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - मनसेतून फुटून आलेल्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने "भूमिपुत्र' नगरसेवकांमध्ये खळबळ माजली आहे. या सहा नगरसेवकांना समित्यांचे अध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असल्याचे समजते. 

मुंबई - मनसेतून फुटून आलेल्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने "भूमिपुत्र' नगरसेवकांमध्ये खळबळ माजली आहे. या सहा नगरसेवकांना समित्यांचे अध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असल्याचे समजते. 

अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेकडून पालिकेतील महत्त्वाची पदे दिली जात होती. 2002 च्या निवडणुकीत वरळी येथून शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेले छोटू देसाई यांना आरोग्य समितीचे अध्यक्षपद दिले होते, तर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनाही आरोग्य समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यामुळे मनसेतून आलेल्या सहा नगरसेवकांनाही एखाद्या विशेष समितीचे अध्यक्षपद मिळण्याची भीती शिवसेनेच्या नगरसेवकांना वाटू लागली आहे. 

तब्बल दोन दशकानंतर पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. चार वैधानिक समित्यांसह दहा समित्या शिवसेनेकडे आहेत. या सहा विशेष समित्यांवर प्रत्येक वर्षी एका नगरसेवकाला अध्यक्षपद मिळाले तरी 30 नगरसेवकांची वर्णी लागणार होती. त्यामुळे दुसऱ्या-तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, हे सहा नगरसेवक वाटेकरी झाल्यामुळे शिवसेनेच्या भूमिपुत्र नगरसेवकांची नाराजी वाढली आहे. या सहा नगरसेवकांना दोन वर्ष समितीचे अध्यक्षपद मिळाले तरी शिवसेनेच्या 12 नगरसेवकांची संधी हुकणार आहे, अशी नाराजी ज्येष्ठ नगरसेवक व्यक्त करत आहेत. 

- स्थायी, बेस्ट, सुधार, शिक्षण या चार वैधानिक आणि महत्त्वाच्या समित्या आहेत. या समित्यांचे अध्यक्ष सहा नगरसेवकांना मिळणे अवघड असले तरी प्रत्येक समितीवर दोन-दोन नगरसेवकांची वर्णी लागली तरी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची संधी हुकणार आहे. 
- स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, आरोग्य, विधी, महिला व बालकल्याण, बाजार व उद्यान या सहा विशेष समित्या आहेत. त्यांचे अध्यक्षपद या नगरसेवकांना मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच 17 प्रभाग समित्या असून त्यावरही या नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Web Title: mumbai news shivsena MNS corporator