गणोरेंचा मुलगा सिद्धांतला जोधपूरमध्ये अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांची पत्नी दीपाली यांच्या हत्येनंतर बेपत्ता झालेला त्यांचा मुलगा सिद्धांत याला गुरुवारी (ता. 25) जोधपूरमध्ये अटक करण्यात आली.

मुंबई - पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांची पत्नी दीपाली यांच्या हत्येनंतर बेपत्ता झालेला त्यांचा मुलगा सिद्धांत याला गुरुवारी (ता. 25) जोधपूरमध्ये अटक करण्यात आली.

खार पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणोरे यांच्या पत्नी दीपालीची बुधवारी (ता. 24) त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी हत्या झाली होती. त्यांच्या मृतदेहाशेजारी रक्ताने "टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हॅंग मी' असे लिहून स्माइलीही काढण्यात आला होता. हत्येनंतर सिद्धांतही बेपत्ता असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. सिद्धांतचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखा आणि वाकोला पोलिस ठाण्याची पथके तयार केली होती.

सिद्धांत जोधपूरला असल्याची माहिती मिळाल्यावर मुंबई पोलिसांनी जोधपूर पोलिसांशी संपर्क साधला. तेथील उदयमंदिर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मदनलाल ननीवाल, उपनिरीक्षक पुणाराम यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी सिद्धांतला हॉटेल धूनमधून ताब्यात घेतले.

मुंबई पोलिसांचे पथक त्याला शुक्रवारी (ता. 26) मुंबईत आणणार आहे. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्याचा छडा लागेल, असा तपास अधिकाऱ्यांचा कयास आहे. पोलिसांनी ज्ञानेश्‍वर गणोरे यांचाही जबाब नोंदवला आहे.

वांद्रे ते जोधपूर
सिद्धांत मंगळवारी सायंकाळी वांद्य्राहून रेल्वेने सुरतला गेला. तेथून त्याने जयपूरला जाणारी गाडी पकडली. तो बुधवारी सकाळी जोधपूरला उतरला. तेथील हॉटेल धूनमध्ये राहिला. पोलिस मोबाईलवरून आपला माग काढतील, अशी भीती असल्यामुळे त्याने मोबाईल घरीच ठेवला होता. जोधपूरला त्याने नवीन मोबाईल खरेदी केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून काही रक्कमही जप्त केली आहे.

Web Title: mumbai news siddhant arrested in jodhpur