सिनेटची मतमोजणी थांबविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करीत उमेदवारांनी सोमवारी (ता. 26) मतमोजणी थांबवण्याची मागणी निवडणूक अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्याकडे केली. विष्णू खोडेकर, संतोष गांगुर्डे, विद्याधर जांभोरीकर, सुनील कंठे, संतोष धोत्रे, महेश सामंत या सहा उमेदवारांनी सोमवारी डॉ. कांबळे यांची भेट घेत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. रविवारी (ता. 25) मतदान केंद्रावर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याची तक्रार या उमेदवारांनी केली. या नेत्यांकडून मतदान प्रक्रियेतही हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराने संतापलेल्या सहा उमेदवारांनी मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली नाही; तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही विद्यापीठाकडून कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त केली.
Web Title: mumbai news sinet counting stop demand