सायन-पनवेल महामार्ग झाला चकाचक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता आता चकाचक झाला आहे. 6 ऑक्‍टोबरपूर्वी अत्यावश्‍यक कामे पूर्ण करायची असल्याने सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामुळे पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याला झळाळी आली आहे. 

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता आता चकाचक झाला आहे. 6 ऑक्‍टोबरपूर्वी अत्यावश्‍यक कामे पूर्ण करायची असल्याने सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामुळे पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याला झळाळी आली आहे. 

सायन-पनवेल मार्गावरील तुर्भे उड्डाणपुलाखालील जंक्‍शनवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे. येथील खड्डे बुजवण्याची मागणी सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका लक्ष देत नव्हती. परंतु, फिफामुळे येथील हद्द वाद मिटला असून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्यांवरील दुभाजकांना पांढरे-पिवळे पट्टे मारून वेगळीच झळाळी देण्याचे काम सुरू आहे. 

नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर 6 ऑक्‍टोबरला पहिला फुटबॉल सामना होणार आहे. त्यापूर्वी सायन - पनवेल महामार्ग व शहरात महत्त्वाच्या ठिकाणांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. वाशी ते बेलापूरदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणी महापालिका बलून्स व होर्डिंग्ज लावणार आहे. वाहतूक बेटांबरोबरच स्टेडियम परिसरात सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नेरूळमधील यशवंतराव चव्हाण मैदानावर सराव सामने होणार आहेत. त्यामुळे मैदानावरील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. वाशीतील एनएमएसएच्या मैदानावरही सराव सामने होणार असून तेथील कामे झाली आहेत. 

फिफा सामन्यांपूर्वी सायन -पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका व बांधकाम विभागासमोर आहे. त्यामुळे मार्गावरील खड्डे बुजवण्याची व रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. 

उड्डाणपुलांखालील पार्किंग बंद 
पावसामुळे सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याविषयी नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला होता. पोलिसांनी याबाबत कंत्राटाराविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिले नव्हते. परंतु फिफामुळे पालिका आणि पीडब्ल्यूडीने रस्त्याच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. याशिवाय पुलाखालील बेकायदा पार्किंग बंद केले आहे. भिकाऱ्यांनाही पुलाखालून हटवले आहे. 

Web Title: mumbai news Sion-Panvel highway