चटई क्षेत्र निर्देशांकांवरील निर्बंधामुळे विकास खुंटला 

चटई क्षेत्र निर्देशांकांवरील निर्बंधामुळे विकास खुंटला 

मुंबई - शहरात गर्दी वाढू नये म्हणून 1991 च्या विकास नियंत्रण नियमावलीत चटई क्षेत्र निर्देशांक नियंत्रित ठेवण्यात आल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम शहरांना भोगावे लागत आहेत. घरांच्या किंमती वाढण्याबरोबरच झोपड्यांचे साम्राज्य पसरले आणि मुंबईचा विकास खुंटला. 

1991 च्या विकास नियंत्रण नियमावलीत शहरासाठी 1.33 चटई क्षेत्र निर्देशांक आणि उपनगरासाठी 1 चटई क्षेत्र निर्देशांक मर्यादित ठेवण्यात आला होता. शहरातील गर्दी वाढू नये म्हणून विकासालाच खीळ लावण्याचा हा प्रकार होता, असे तज्ज्ञांचे मत आहे. नव्वदच्या दशकापासून घरांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली; परंतु त्यांची निर्मिती मात्र त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी घरांच्या किमती गगनाला भिडल्या. नियंत्रित चटई क्षेत्र निर्देशांकामुळे भ्रष्टाचारालाही वाव मिळाला. खुद्द पालिकेचे अधिकारीच त्याची कबुली देतात. 

विकास आराखडा तयार करताना झालेली चूक सुधारण्यासाठी 27 वेळा चटई क्षेत्र निर्देशांकात फेरफार करण्यात आला; परंतु समस्या "जैसे थे' राहिली. घरांच्या किमती वाढल्यामुळे झोपड्यांचे साम्राज्य पसरले. त्यांच्यासाठी पुनर्वसन योजना जाहीर करण्यात आली. तिला अपेक्षित यश मिळाले नाही. ही चूक सुधारण्यासाठी 2034 च्या प्रस्तावित विकास आराखड्यात व्यवसाय आणि निवासी क्षेत्रासाठी चटईक्षेत्र वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या इमारतींचा विकास होईल. त्याचबरोबर परवडणारी घरे बांधण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत प्रोत्साहन देण्यात आले आहे, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. 

बिल्डर झाले गब्बर 
आरक्षित भूखंड पालिकेला दिल्यावर त्या मोबदल्यात "ट्रान्स्फर डेव्हलपमेंट राईट' (टीडीआर) अंतर्गत चटई क्षेत्र मिळत होते. हा टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) पाच-सहा व्यावसायिकांनी जमा केला. त्यांनी घरांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले. 

धोकादायक इमारती वाढल्या 
जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा ठोस विचार 1991 च्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात आला नाही. त्यामुळे चाळींचा योग्य वेळी पुनर्विकास होऊ शकला नाही. परिणामी, अनेक कुटुंबे आजही टेकू लावलेल्या धोकादायक चाळींमध्ये राहत आहेत. अशीच परिस्थिती काही प्रमाणात मुंबई उपनगरातही आहे. 

मोकळ्या जागा मिळाल्या नाहीत 
आरक्षित जागांवर झोपड्या उभ्या राहिल्यामुळे त्यांच्यावरील विकास रखडला. पायाभूत सुविधांमध्ये अडथळे निर्माण झाले. उद्याने, मैदाने, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी प्राथमिक सुविधा पुरवण्यातही पालिकेला अपयश आले. 

नवा चटईक्षेत्र निर्देशांक 
- निवासी क्षेत्रासाठी - दोन 
- म्हाडा वसाहतींसाठी - तीन 
- झोपडपट्टी पुनर्वसन - तीन 
- समूह विकास - चार 
- आय. टी. कंपन्या, स्टार हॉटेल्स, बायो टेक्‍नॉलॉजी कंपन्या ः पाच 
- परवडणारी घरे - चार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com