सामाजिक बहिष्काराबद्दल आठ जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई -  नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याने सामाजिक बहिष्कार टाकल्याबद्दल घडशी समाजातील आठ जणांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 21) गुन्हा दाखल करण्यात आला. 

मुंबई -  नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याने सामाजिक बहिष्कार टाकल्याबद्दल घडशी समाजातील आठ जणांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 21) गुन्हा दाखल करण्यात आला. 

सामाजिक बहिष्काराविरोधात कायदा झाल्यानंतर दाखल केलेला मुंबईतील हा पहिला गुन्हा असल्याचे समजते. दादर परिसरात राहणारे प्रभाकर भोसले घडशी समाजातील आहेत. ते सनई चौघडा वादक आहेत. त्यांच्या नातेवाइकाचा 2010मध्ये मृत्यू झाला. भोसले यांनी नाशिकचे सनई-चौघडे वाजवण्याचे कंत्राट घेतल्यामुळे त्यांना नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही; पण भोसले यांची पत्नी अंत्यसंस्काराला गेली होती. तरीही त्यांच्या समाजाने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. गेल्या वर्षी भोसले यांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हाही त्यांचे नातेवाईक आले नाहीत. मुलाचे जुळलेले लग्नही मोडण्यात आल्याची माहिती भोसले यांनी पोलिसांना दिली. 

भोसले यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर घडशी समाजातील 7-8 जणांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली. 

पाच वर्षांपासून समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला बोलावले जात नाही. या बहिष्कारामुळे आपले आर्थिक नुकसान झाल्याचे भोसले यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

याप्रकरणी अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. 21) शिवाजी पार्क पोलिस ठाणे गाठले आणि महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. 

बहिष्कार टाकल्याप्रकरणी घडशी समाजाच्या संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल. 
- गंगाधर सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलिस ठाणे 

सात वर्षे तुरुंगवास, पाच लाख दंड 
सामाजिक बहिष्कार हा गुन्हा आहे. यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास सात वर्षे तुरुंगवास आणि पाच लाखांचा दंड होऊ शकतो. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे राज्यातील पहिले राज्य आहे.

Web Title: mumbai news social boycott