मुंबईकरांना सावरण्यात सोशल मीडियाचा सिहांचा वाटा!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - तुफानी पावसामुळे अडकून पडलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना कालच्या (ता. 29) संकटात सोशल मीडियाची चांगली मदत झाली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सोशल मीडियाने मोठा हातभार लावल्याने मुंबईकरांना कालच्या मुसळधार पावसात दिलासा मिळाला आहे. बारा वर्षांपूर्वीच्या 26 जुलै 2005 च्या हाहाकार माजविणाऱ्या पावसाच्या तुलनेत कालच्या पावसाशी सामना करताना सोशल मीडिया धावून आला.

मुंबई आणि परिसरात 26 जुलै 2005 रोजी पावसाने हाहाकार माजवला होता. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. या तुलनेत कालच्या घटनेत फार जीवितहानी झाली नाही. यामध्ये सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या बारा वर्षांत कालावधीत इंटरनेट, वाय-फाय, सोशल मीडियाचा बराच विकास झाला आहे. या साधनांचा मुंबईकर, राज्य, पोलिस, महापालिका प्रशासनाने, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने मोठ्या प्रमाणात वापर केला. दादर, लालबाग, शिवडी, परळ आदी भागांत पाणी साचलेल्या ठिकाणाचे फोटो, माहिती, तेथील मुंबईकर, चाकरमाने यांनी मोबाईलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांकडे पाठवले. त्याची प्रशासन, आपत्ती निवारण यंत्रणांनी तत्काळ दखल घेत मदतीची कार्यवाही केली. ज्या ज्या ठिकाणी झाडे पडणे, वाहने अडकण्याच्या घटना झाल्या त्याबाबत एकमेकांना ताजी माहिती देण्यात येत होती. तसेच रेल्वे सेवा ठप्प झाल्यानंतर तात्पुरती अन्न व राहण्याची सोय करण्यासाठी व्हॉट्‌स ऍपचा वापर करून संकटात अडकलेल्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. सोशल मीडियामुळे सातत्याने ताजी माहिती मिळत असल्याने आवश्‍यक ठिकाणी मदतकार्य करणे अधिक सोपे गेल्याचे दिसून आले.

Web Title: mumbai news Social Media contribution towards saving Mumbai people