वास्तू दर्शनासाठी स्पेशल पॅकेज

ऊर्मिला देठे
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबई - हेरिटेज दर्जा मिळालेल्या वास्तूंचे आणि स्थळांचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पावले उचलली आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना हेरिटेज वास्तूंचे दर्शन घडवण्यासाठी विशेष पॅकेजची "एमटीडीसी'ची योजना आहे.

मुंबई - हेरिटेज दर्जा मिळालेल्या वास्तूंचे आणि स्थळांचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पावले उचलली आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना हेरिटेज वास्तूंचे दर्शन घडवण्यासाठी विशेष पॅकेजची "एमटीडीसी'ची योजना आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट रेल्वेस्थानक, मुंबई उच्च न्यायालय, फ्लोरा फाउंटन, ओव्हल मैदान, दादीसेठ अग्यारी, मेट्रो सिनेमा याशिवाय सेंट झेवियर्स महाविद्यालय या ठिकाणांना हेरिटेज दर्जा आहे. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील 35 पुरातन वास्तूंजवळून कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो-3चा मार्गही जाणार आहे. मार्गावर एवढ्या मोठ्या संख्येने पुरातन वास्तू असलेला हा बहुधा मुंबईतील पहिलाच प्रकल्प असावा. पर्यटनासाठी या भूमिगत वातानुकूलित प्रकल्पाचाही विचार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हेरिटेज वारसा जतन समिती, मुंबई मेट्रो-3 प्राधिकरण, एमटीडीसी आणि राज्याचे पर्यटन खात्याचे अधिकारी यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू आहे.

महाविद्यालयांपुढे आव्हान
मुंबईतील काही महाविद्यालयांना हेरिटेजचा दर्जा आहे; परंतु त्यांच्या इमारतींच्या संवर्धनाचे आव्हान सरकारपुढे आहे. त्यांच्या इमारतींची डागडुजी आणि "हेरिटेज'बाबत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी दिलेली रक्कम तुटपुंजी आहे. हेरिटेज दर्जा देताना "यूजीसी'ने सेंट झेविअर्स कॉलेजला एक कोटी 53 लाख, तर पुण्याच्या फर्गसन आणि नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजला प्रत्येकी केवळ 20 लाखांचे अनुदान दिले आहे. मुंबईच्या उष्ण व दमट हवामानाचा विचार करता, इमारतींची वर्षातून दोनदा- पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर डागडुजी आवश्‍यक आहे. झेविअर्स कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी वर्ग चालतात. या विषयात बीए, एमए आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेता येते. त्यामुळे महाविद्यालयांच्या निधीत हेरिटेज दर्जा टिकवणे अवघड जात असल्याचे त्यांच्या व्यवस्थापनांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news Special package for architectural viewing