अपघातानंतरही साक्षीची यशाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - यश मिळण्याचा मार्ग खडतर असला तरी जबरदस्त इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीपुढे यशही नतमस्तक होते याचा दाखला साक्षी कनवजे या विद्यार्थिनीने दिला आहे. परीक्षेच्या महिनाभरापूर्वी बसथांबा अंगावर पडून झालेल्या अपघातामुळे खचून न जाता दहावीची परीक्षा देणारी साक्षी ९५.६० टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण झाली.

बालमोहनची विद्यार्थिनी असलेल्या साक्षीचा परीक्षेला काही दिवस शिल्लक असतानाच एक विचित्र अपघात झाला. दादरमधील प्लाझा सिनेमाजवळील बसथांब्यावर बसची वाट पाहत उभी असताना अचानक बसथांब्याचा खांब तिच्यावर पडला आणि ती जखमी झाली. वैद्यकीय तपासणीत तिच्या पाठीच्या मणक्‍याला सात फ्रॅक्‍चर असल्याचे निदान झाले. हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर १० दिवस उपचार करण्यात आले. सलग १० मिनिटे बसणेही शक्‍य नव्हते; पण यशाचा ध्यास घेतलेल्या साक्षीने झोपूनच अभ्यासाला सुरुवात केली. 

परीक्षेसाठी तिला साने गुरुजी विद्यालय केंद्र आले होते. लिहिताना तिला व्यवस्थित बसता यावे यासाठी विशेष व्यवस्था असावी, यासाठी तिचे वडील प्रताप कनवजे यांनी शिक्षण मंडळाला विनंती केली आणि ती विनंती मान्य करून बालमोहन विद्यालयामध्येच तिला परीक्षा केंद्र दिले. कितीही त्रास झाला तरी याचवर्षी दहावी पास करायचे आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असे मी ठरविले होते. याशिवाय हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. केदार देवगावकर यांनी मला परीक्षेला तयार होण्यासाठी खूप सहकार्य केले. पाठीला पट्टा लावून मी परीक्षेला जायचे. शिक्षक आणि डॉक्‍टर यांच्यामुळे मला परीक्षेत उत्तम यश मिळाले, असे साक्षी म्हणाली. तिचे वडील रिक्षाचालक असून, मुलीच्या भरघोस यशाने घरातील सर्वांनाच आनंद झाला आहे. 

Web Title: mumbai news ssc result sakshi kanwaje