सदोष बियाणे विक्रीची सीबीआय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मुंबई / यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक विषबाधाप्रकरणी केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या तपासणीत पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये "हर्बिसाइड टॉलरन्ट जीन्स' आढळून आले. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार हे जीन्स घातक असल्यामुळे पाचही कंपन्यांविरुद्ध नागपूर येथे गुन्हा नोंदविला आहे. मात्र, या बियाण्यांच्या उत्पादनाचे जाळे अनेक राज्यांत पसरले असल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

कीटकनाशक विषबाधेने यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला; तर सातशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक नेमून चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी न्याय्य हक्क आंदोलन समितीने वारंवार लावून धरली. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असून, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सकाळ माध्यम समूहाचे कृषी दैनिक "ऍग्रोवन'मधून राज्यासह देशातील कापूस उत्पादक अनेक राज्यांत तणनाशकनिरोधक बीटी बियाण्यांची 35 लाख पाकिटे अवैधरीत्या विकल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारने गुरुवारी केंद्र सरकारला तणनाशकनिरोधक बीटी कपाशी बियाण्यांच्या अवैध उत्पादन व विक्रीची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विनंती केली आहे. वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तणनाशकनिरोधक कापसाच्या बियाण्याचा मुद्दा ऐरणीवर असतानाच राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या बियाण्यांवर बंदीची मागणी केली. त्यापाठोपाठ तिवारी यांनीदेखील हा मुद्दा केंद्रीय गृहमंत्रालयासमोर उपस्थित करून थेट सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शेतकरी न्याय्य हक्क आंदोलन समितीनेही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

संघ परिवाराचाही विरोध
विशेष म्हणजे हे सदोष बियाणे अधिकृतपणे बाजारात येणार होते, त्यासाठी मॉन्सॅन्टोने या बियाण्यांचे उत्पादनही केले. मात्र, संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंच या संघटनेने या बियाण्यांना तीव्र विरोध केला होता. त्यामुळे केंद्राने या बियाण्यांना परवानगी दिली नाही, अशी माहिती देऊन किशोर तिवारी म्हणाले, की या बियाण्यांच्या पाकिटाची किंमत 200 रुपये असताना बाजारात ते 1100 रुपयांना विकण्यात आले. सीबीआयद्वारे चौकशीविना हे प्रकरण निकाली निघणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: mumbai news sseed sailing cbi inquiry