एसटीचे जाताना जादा; येताना कमी भाडे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

ठाणे-पुणेदरम्यान पर्यायी मार्गामुळे पडतोय फरक

ठाणे-पुणेदरम्यान पर्यायी मार्गामुळे पडतोय फरक
मुंबई - एकाच मार्गावरील भाडेदरात सध्या मोठा फरक ठाण्यातील प्रवासी एसटी प्रवासात अनुभवत आहेत. ठाण्यापासून स्वारगेटपर्यंतच्या प्रवासात जादा भाडे व येताना कमी भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील रबाळे येथील उड्डाण पुलावर सुरू असलेल्या कामांमुळे अन्य पर्यायी मार्ग दिल्यामुळे भाडेदरात फरक पडत असल्याचे एसटीच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

ठाण्यातील वंदना टॉकीज येथून पुण्यातील स्वारगेटपर्यंत "शिवनेरी' एसटी बस सोडल्या जातात. याच मार्गावर निमआराम व साध्या बस धावतात; परंतु रबाळे येथील उड्डाण पुलावर सुरू असलेल्या कामामुळे ठाण्यातून स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या बसना नवी मुंबईतूनच अन्य पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यातून सुटणाऱ्या बस नेहमीच्या मार्गाऐवजी ऐरोली, रबाळे, (उड्डाण पूल सोडून) एमआयडीसी महापेमार्गे स्वारगेटकडे रवाना होतात. परत येताना ऐरोली, मुलुंड, तीन हात नाका अशा नियोजित मार्गाने ठाण्यात जातात.

रबाळे उड्डाण पुलावर काम सुरू असल्याने तो वगळून एसटी बस एमआयडीसीत आत जातात व पुन्हा बाहेर येऊन नेहमीच्या मार्गावरून पुढे रवाना होतात. त्यामुळे किलोमीटर वाढत असल्याने एसटी महामंडळ जास्त भाडे आकारत आहे. वातानुकूलित "शिवनेरी' बससाठी प्रत्येक प्रवाशाकडून 456 रुपये आकारण्यात येतात. स्वारगेटपासून ठाणे शहरात येताना 441 रुपये भाडे घेतले जाते. हीच परिस्थिती ठाणे ते पुणे मार्गावर धावणाऱ्या अन्य बससेवांचीही आहे.

प्रवाशांना भुर्दंड कशासाठी?
ठाणे शहरातून जाताना एसटी बस 26 ऐवजी 27 टप्पे पार करते. त्यामुळे जास्त भाडे घेतले जाते. पुण्याहून येताना बस 26 टप्पेच पूर्ण करते. त्यामुळे नेहमीइतकेच भाडे घेतले जाते, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. मुळातच पर्यायी मार्गाचा भुर्दंड प्रवाशांना कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: mumbai news st rent