संपापूर्वीच कामगार संघटनांमध्ये फूट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई - कंत्राटी पद्धतीने 450 बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिल्यानंतर त्याविरोधात बेस्ट कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बेस्ट कामगार संयुक्त समितीने तर 15 फेब्रुवारीला बंदची हाक दिली आहे; मात्र संपामुळे बेस्टचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे संप सध्या तरी परवडणारा नाही, अशी भूमिका घेऊन बेस्ट कामगार सेनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसनेही संप करून मुंबईकरांना वेठीस धरू नये, असे आवाहन केले आहे.

खासगी बस खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने बेस्टची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाल्याची भीती कामगार संघटनांकडून व्यक्त होत आहे. या संकटातून बेस्टला वाचविण्यासाठी कामगार संघटनांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावास पाठिंबा दिल्याने 15 फेब्रुवारीच्या संपात बेस्ट कामगार संघटना सहभागी होणार नसल्याची चर्चा सोमवारपासून सुरू होती. त्यावर आज शिवसेनेने शिक्कामोर्तब केले. बेस्ट कामगार सेना संपात सहभागी होणार नाही आणि संप यशस्वी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बेस्ट समितीतील शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य सुहास सामंत यांनी घेतली.

नियमित वेतन, बोनस आदी मागण्यांसाठी उपक्रमातील संघटनांनी एकत्र येत बेस्ट कामगार संयुक्त समिती स्थापन केली आहे. यामधून बेस्ट कामगार सेना आता बाहेर पडली आहे. बेस्टमध्ये कोणत्याही प्रकारचे खासगीकरण होत नसल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. बेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना संप करण्याची ही वेळ नाही. पालिका आयुक्तांनी नव्या बसमधून होणारे नुकसान भरून देण्याची तयारी दर्शविली आहे. कर्मचारी कपातही होणार नसल्याने संपाचे काहीही प्रयोजन नाही. बेस्ट वर्कर्स युनियनची ताकद वाढविण्यासाठी हा संप असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. उपक्रमात बेस्ट कामगार सेनेचे 18 हजार सदस्य आहेत. ते हा संप यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप बेस्ट कामगार संघाची गुरुवारी सायंकाळी 6 वाजता बैठक होणार आहे. त्यात सदस्यांची मते जाणून घेण्यात येऊन त्यानंतर संपाबाबत निर्णय घेतला जाईल.
- सुनील गणाचार्य, सदस्य, भाजप बेस्ट समिती

शिवसेना-भाजप एकत्र असताना बेस्ट सुरळीत होती. दोन्ही पक्षांत मतभेद सुरू झाल्यानंतरच बेस्ट अडचणीत का? संप करू नये, मुंबईकरांना वेठीस धरू नये. खासगीकरणाला आमचा विरोध आहे.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका

Web Title: mumbai news strike worker organisation divide