विद्यार्थी लुटणार फिफाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

महापालिकेच्या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत सामने पाहता यावेत यासाठी महापालिकेने फिफाकडे तिकिटांची मागणी केली होती. यातील आठ हजार तिकिटे मिळाली असून उर्वरित लवकरच मिळणार आहेत. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त.

नवी मुंबई - डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिफा ज्युनियर विश्‍वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी फिफा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहा हजार तिकिटे देणार आहे. फिफाचे आयोजन करण्यात महापालिकेने यजमान म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत वॉकेथॉनचे आयोजन केले होते. त्यात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांना सामने पाहण्यासाठी मोफत तिकिटे द्यावी, अशी मागणी पालिकेने केली होती. त्यानुसार पहिल्या दिवशीच्या ‘फ्लॉप शो’नंतर फिफाने ही विनंती मंजूर केल्याची चर्चा आहे.

फिफाच्या माध्यमातून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल सामने होणार असल्याने महापालिकेने होस्ट सिटी म्हणून जबाबदारी स्वीकारत शहराचा कायापालट केला आहे. चकाचक रस्ते, निटनेटके पदपथ, सुसज्ज उद्याने व सौंदर्यकरण केलेली वाहतूक बेटे असे दृश्‍य अलीकडे नवी मुंबईत आहे. फिफाच्या माध्यमातून अनेक विकासकामे करत त्याचा फायदा स्वच्छता अभियानासाठी करून घेण्याचा महापालिकेने प्रयत्न केला. याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरात वॉकेथॉनचे आयोजनही केले होते. यात तब्बल ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल केली आहे. वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी दहा हजार विद्यार्थ्यांना फुटबॉलच्या सामन्यांची मोफत तिकिटे देण्याची मागणी महापालिकेने फिफाकडे केली होती. पण त्याची त्यांनी दखल घेतली नव्हती; परंतु शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत तिकिटे देण्याची तयारी दर्शवली आहे. या सामन्यात विक्री झालेल्या तिकिटांपेक्षा कमी प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आल्यानंतर फिफाचे डोळे उघडले. सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांनी फुटबॉलच्या सामन्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे स्टेडियममधील स्टॅंड अर्धे रिकामे होते. आता सोमवारी (ता. ९) होणारे फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी दहा हजार तिकिटे देण्याची महापालिकेची मागणी फिफाने मान्य केली आहे. फिफाकडून महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार तिकिटे देण्यात आली आहेत. 

फिफा आयोजनातील सोमवारी तुर्की विरुद्ध माली व पेरुग्वे विरुद्ध न्यूझीलंड यांचे सामने होणार आहेत. हा दिवस कामकाजाचा असल्याने व सायंकाळी पावसाचे सावट असल्यामुळे या सामन्यालाही कमी प्रतिसाद मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात महापालिकेच्या दहा हजार विद्यार्थ्यांनी जरी हजेरी लावली तर स्टेडियम भरलेले दिसणार आहे. 

Web Title: mumbai news student fifa

टॅग्स