अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलात! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - फ्रान्समधील "स्कॉर्पिओ' जातीची, पण माझगाव डॉकमध्ये बांधलेली पहिली पाणबुडी "कलवरी'चा ताबा गुरुवारी नौदलाला देण्यात आला. लवकरच तिचा नौदल ताफ्यात समावेश करण्यात येईल. 

मुंबई - फ्रान्समधील "स्कॉर्पिओ' जातीची, पण माझगाव डॉकमध्ये बांधलेली पहिली पाणबुडी "कलवरी'चा ताबा गुरुवारी नौदलाला देण्यात आला. लवकरच तिचा नौदल ताफ्यात समावेश करण्यात येईल. 

तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार अशा सहा पाणबुड्या भारतात बांधण्यात येणार आहेत. याविषयीचा करार 2005 मध्ये झाला होता. भारताची पहिलीवहिली पाणबुडी "कलवरी' 1996 मध्ये नौदल सेवेतून निवृत्त झाली होती. तिचेच नाव या अत्याधुनिक पाणबुडीला देण्यात आले आहे. भारताकडे रशियन बनावटीच्या साध्या पाणबुड्या असून त्यानंतर जर्मन बनावटीच्या पाणबुडीविरोधी पाणबुड्याही भारतात बांधल्या गेल्या; पण स्कॉर्पिओ बनावटीच्या पाणबुड्या सर्वात अत्याधुनिक आहेत. या तिन्ही पाणबुड्या डीझेल इलेक्‍ट्रिक वर्गातील आहेत; पण स्कॉर्पिओ बनावटीची पाणबुडी पहिल्या दोन प्रकारच्या पाणबुड्यांपेक्षा जास्त काळ समुद्राखाली राहू शकते. कमी आवाज आणि विशिष्ट आकारामुळे ती शत्रूच्या रडारवर दिसत नाही. तिचा माग काढणे शत्रूला फारच कठीण जाते. अत्याधुनिक शस्त्रांनी ही पाणबुडी शत्रूवर अचूक हल्ला करू शकते. 

शत्रूच्या पाणबुड्यांवर तसेच जहाजांवर हल्ला करणेही तिला सहज शक्‍य आहे. या जातीची दुसरी पाणबुडी "खांदेरी' हिच्या सध्या समुद्री चाचण्या सुरू आहेत. "करंजा' या तिसऱ्या पाणबुडीचे जलावतरण वर्षाच्या अखेरीस केले जाईल. आणखी तीन पाणबुड्यांची बांधणीही सुरू आहे.

Web Title: mumbai news submarine