सुपरमून, ब्ल्यूमून एकत्र पाहण्याचा आज योग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

आज आकाशातील हा अद्‌भूत सोहळा पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींना मिळणार आहे. खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून एकत्रित पाहण्याचा दुर्मिळ योग १५२ वर्षांनी येणार आहे. 

मुंबई - खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून एकत्रित पाहण्याचा दुर्मिळ योग १५२ वर्षांनी येणार असून आज ३१ जानेवारीला आकाशातील हा अद्‌भूत सोहळा पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्थिती साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. 
moonmoon

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. मात्र सुपरमून ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे. एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्ल्यू मून म्हणतात. त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र ब्ल्यू दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून आज ३१ जानेवारीच्या चंद्रास ब्ल्यू मून म्हटले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ते रात्री ७ वाजून ३८ मिनिटांपर्यंत आकाशात पूर्वेकडे साध्या डोळ्यांनी सुपर आणि ब्ल्यू मूनचे दर्शन घेता येईल, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. ३१ मार्च १८६६ नंतर १५२ वर्षांनी हा योग येणार आहे.

moon

चंद्रग्रहण 
आज बुधवारी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितिजाच्याखाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल. ग्रहणमध्य सायंकाळी सात वाजता असून त्यावेळी चंद्रबिंब आकाशात पूर्वेला बरेच वर आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल.

moon2

Web Title: mumbai news supermoon bluemoon Lunar eclipse