प्रदूषणकारी कंपनी बंद करण्याचा आदेश 

सुजित गायकवाड / दीपक घरत 
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पनवेल  -  कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान- चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) डुकॉल ऑर्गेनिक्‍स ऍण्ड कलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शुक्रवारी दिला. 

एमआयडीसीतील प्रदूषणामुळे श्‍वान, तसेच चिमण्यांचे रंगही निळे झाल्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर "सकाळ' तसेच "साम टीव्ही'ने प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर "एमपीसीबी'ला ही कारवाई करावी लागली. 24 तासांत या कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे. 

हिरव्या पावसानंतर आता निळी कुत्री; पनवेलमध्ये प्रदूषणाचा घातक विळखा

आशिया खंडातील सर्वांत मोठी तळोजा औद्योगिक वसाहत प्रदूषणामुळे पोखरून निघाली आहे. या प्रदूषणाचा फटका मानवाबरोबरच मुक्‍या जिवांनाही बसत असल्याचे "सकाळ'ने उघड केले होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याची दखल घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर "एमपीसीबी'चे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी आज "सकाळ' आणि "साम टीव्ही'च्या प्रतिनिधींसोबत परिसराचा दौरा केला. पाहणीदरम्यान "टीम सकाळ'च्या वृत्तात तथ्य आढळून आल्यानंतर मोहेकर यांनी कंपनी बंद करण्याचा आदेश दिला. 

नमुन्यांची तपासणी होणार 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दौऱ्यादरम्यान प्रत्येक ठिकाणच्या, तसेच एमआयडीसीच्या "कॉमन इन्फल्युएन्स ट्रीटमेंट प्लान्ट'मधील (सीईटीपी) प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने महापे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती "एमपीसीबी'चे अधिकारी जयंत हजारे यांनी दिली. 

Web Title: mumbai news taloja-midc-pollution sakal news impact