रात्र ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक पगाराविना

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई : रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी पगाराविना अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई : रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी पगाराविना अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

17 मे 2017 च्या शासन निर्णयानुसार रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेजमधील 1010 शिक्षक व 348 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा शासनाने समाप्त केली. दिवसा अतिरिक्त असलेले माध्यमिक शिक्षक रात्र शाळेमध्ये पाठवले. परंतु, दिवसा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकही शिक्षक अतिरिक्त नसल्यामुळे रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेतून कमी न करता त्यांना शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या 21 जुलै 2017 रोजीच्या पत्रानुसार रात्र कनिष्ठ महाविद्यालयात सेवेत ठेवले. तसेच शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या 28 ऑगस्ट व 29 ऑगस्ट 2017 या दोन पत्रांनुसार रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन तत्काळ अदा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतु, अद्यापपर्यंत रात्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. सदर प्रकरणाची शिक्षण उपसंचालक व वेतन अधिक्षक यांना विचारणा केली असता सदर शिक्षकांची नावे शालार्थ वेतन प्रणालीतून कमी केली आहेत. म्हणून या शिक्षकांचे नाव शालार्थ प्रणालीत शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयामार्फतच समाविष्ट करावे लागतील, असे तोंडी सांगण्यात आले. परंतु, अद्यापपर्यंत वेतन मिळण्यासाठीची कोणतीही ठोस कार्यवाही शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची दिवाळी पगाराविना अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिक्षक उपसंचालक यांचे वेतन अधिक्षक यांना लेखी आदेश असताना रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन जाणीवपूर्वक ऐण सणासुदीच्या दिवसात थांबवले जात आहे, ही बाब अतिशय निषेधार्ह आहे. शिक्षक उपसंचालक कार्यालय व वेतन अधिक्षक यांच्यामध्ये समन्वय नसल्याने जाणीवपूर्वक रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन थांबवले गेल्याचे शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेजचे मुंबई अध्यक्ष प्रा. शरद गिरमकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news teacher of the night junior college payment issue