निवडश्रेणीसाठी अटी लादल्याने शिक्षक संतप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - निवडश्रेणीसाठी शिक्षण विभागाने नव्याने लादलेल्या अटींमुळे शिक्षक संघटना चांगल्याच संतापल्या आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

मुंबई - निवडश्रेणीसाठी शिक्षण विभागाने नव्याने लादलेल्या अटींमुळे शिक्षक संघटना चांगल्याच संतापल्या आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

निवडश्रेणी पात्रता पूर्ण केलेल्या शिक्षकांवर निवडश्रेणी मिळण्यासाठी नव्या अटी लादण्यात आल्या आहेत. या शिक्षकांच्या नववी व दहावीच्या वर्गाचा निकाल 80 टक्के असावा, शाळेचा दर्जा "अ' श्रेणीत असावा या अटी लादल्याने शिक्षक संतापले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना बढती देताना संबंधित अधिकाऱ्यांची गुणवत्ता तपासली जाते का, असा सवाल शिक्षक परिषदेने केला आहे. या अटी राज्य घटनेविरोधात आहेत, असा आरोपही शिक्षक परिषदेने केला आहे.

चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर 12 वर्षांनी वरिष्ठ श्रेणी व 24 वर्षांनी निवडश्रेणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदेशीर तरतूदी डावलून शिक्षण विभाग निर्णय घेत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला. दिवाळीची सुटी संपताच शिक्षक काळ्या फिती लावून निषेध नोंदवतील, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी सांगितले. या विरोधात 3 नोव्हेंबरला पुण्यातील आयुक्त कार्यालयाजवळ शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

Web Title: mumbai news The teacher suffers due to the selection criteria