पालिकेचा तीन मंदिरांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कांदिवली/चारकोप - चारकोपमधील सेक्‍टर १ व २ मधील रस्त्यावरील ‘ब’ दर्जाच्या तीन मंदिरांवर मंगळवारी (ता. १८) पालिकेच्या आर/दक्षिण विभागाने कारवाई केली. यामध्ये सेक्‍टर १ येथील साईबाबांच्या दोन मंदिरांचा, तर सेक्‍टर २ येथील गणेश मंदिरांचा समावेश आहे. कारवाईवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पाच मंदिरांची यादी होती; मात्र दोन मंदिरे एसआरएमधील जागेत आल्याने ती पुनर्विस्थापित होणार असल्याने त्यांच्यावर कारवाई केली नाही.

वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यावरील मंदिरांवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिकेने मंदिराच्या ट्रस्टींना पूर्वसूचना देत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता मंदिरावर कारवाई केली. पालिकेचे ४० कर्मचारी, १५ अधिकारी, दोन जेसीबी, एक ब्रेकर, एक कटर याच्या साह्याने मंदिरे पाडण्यात आली. या वेळी चारकोप पोलिस ठाण्याचे सहायक आयुक्त श्रीरंग नाडगौडा व वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार भालशंकर यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सेक्‍टर १ मधील साईबाबा मंदिर पाडल्यानंतर राजे छत्रपती मैदानाच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या साई मंदिरावर कारवाई केली. सेक्‍टर २ मधील सुप्रसिद्ध गणेश मंदिरही पाडण्यात आले. तब्बल चार तास ही कारवाई चालली. या कारवाईने चारकोपमधील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. २० वर्ष महापालिका झोपली होती का, असा प्रश्‍न स्थानिकांनी उपस्थित केला. या वेळी नगरसेवक व आमदार उपस्थित नसल्याने त्यांच्यावरही काही नागरिकांनी तोंडसुख घेतले.

मंदिरावरील कारवाईबाबत ट्रस्टीना पूर्वसूचना दिल्याने मूर्ती व अन्य साहित्य कारवाईपूर्वीच काढून ठेवले होते. कारवाईस विरोध झाला नाही. कारवाईवेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- श्रीरंग नाडगौडा, सहायक पोलिस आयुक्त, चारकोप पोलिस ठाणे

Web Title: mumbai news temple municipal corporation