ठाण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक 

श्रीकांत सावंत
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

  • नवरात्रींमधील सोनसाखळी चोरी 
  • छेडछाड आणि टवाळखोरी थांबवणार 
  • एक उपनिरीक्षक आणि 20 महिला पोलिसांचे पथक करणार कारवाई 

ठाणे : नवरात्रोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांची छेडछाड करणे, चैन स्नॅचिंग करण्याचे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी नौपाडा पोलिसांच्या वतीने महिला पोलिसांचे दामिनी पथक सज्ज करण्यात आले आहे. हे पथक रात्रीच्यावेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालून महिलांना त्रास देणारी टोळकी आणि गुंडांवर तात्काळ कारवाई करणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळ एकचे उपायुक्त डाॅ. डी. एस. स्वामी यांनी गुरूवारी या पथकाला हिरवा झेंडा दाखवून कार्यरत केले. पोलिस निरिक्षक प्रियतमा मुठे यांच्या नेतृत्वाखाली 20 महिला पोलिसांचे पथक महिला सुरक्षेसाठी सज्ज राहणार आहेत. 

नवरात्र उत्सवा दरम्यान महिलांच्या सुरक्षेकरीता व चैन स्नॅचिंगला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळ एकचे उप आयुक्त डाॅ. डी. एस. स्वामी, सह पोलिस आय़ुक्त नौपाडा विभाग अभय सायगावंकर व नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रियतमा मुठे यांचे नेतृत्वाखाली एक पोलिस उप निरिक्षक व 20 पोलिस महिलांचे दामिनी पथक सज्ज करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत 20 हिरकरणी महिला मंडळाच्या पोलिस मित्र महिलाही विविध भागामध्ये गस्त घालणार आहेत. या शिवाय हे पथक महिला मंडळे, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी स्वयंपुर्ण व्हावे तसेच अन्यायग्रस्त मुली व महिलांना निसंकोचपणे तक्रार मांडता यावी याकरीता समुपदेशन करणार आहे. शहरातील शाळा व महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, बाहेरून येणाऱ्या टोळक्यांकडून युवतींची होणारी छेडछाड थांबवण्यासाठी दामिनी पथकातील महिला सक्रीय राहणार आहेत. 

हेल्पलाईन वरील तक्रारींची दखल... 
महिलांबाबतच्या कोणत्याही तक्रारीकरीता 103 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाईनवरून येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे हे पथक दखल घेणार असून त्याविषयी योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार आहे. याशिवाय हे पथक महाविद्यालयाच्या परिसरात फिरून महिलांच्या सुरक्षिततेबाबत स्वयंपुर्ण करण्याच्या दृष्टीने जागृती करणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news thane police deploys damini to protect women