रमाबाई नगरातील शौचालय घोटाळ्याची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

मुंबई - घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगरात उभारलेल्या शौचालयांच्या कामांतील अनियमिततेवर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठपका ठेवला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला असून एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर हे या प्रकरणी चौकशी करणार आहेत.

रमाबाई नगरातील नागरिकांसाठी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2013 मध्ये शौचालये उभारली होती. मंडळाने येथे पाचशे शौचालये उभारणे आवश्‍यक होते; मात्र जागा उपलब्ध नसल्याने म्हाडाला येथे शौचालये उभारता आली नाहीत.

मंडळाने 318 शौचालये उभारली; यात अपेक्षित निधीपेक्षा जास्त खर्च झाल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. या प्रकरणाची दखल घेत गृहनिर्माण विभागाने म्हाडाकडून खुलासा मागवला. सुधार मंडळाने याबाबत गृहनिर्माण विभागाला माहिती पाठवली होती. यावर वरिष्ठांचे समाधान न झाल्याने प्रकरणाच्या सखोल चौकशीचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. त्यानुसार एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर या घोटाळ्याची चौकशी होणार आहे, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यात अधिकारी दोषी आढळल्यास तातडीने निलंबन केले जाईल, असे पत्रही म्हाडाला गृहनिर्माण विभागाने पाठवले आहे.

Web Title: mumbai news toilet scam inquiry