स्वच्छतागृहांचा शोध होणार झटपट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - महानगरी मुंबईत सार्वजनिक स्वच्छतागृह शोधणे म्हणजे नाकीनऊ येतात. विशेषतः महिलांसाठी हे खूपच तापदायक ठरते. पण आता स्वच्छतागृहाचा शोध खूपच सोपा होणार आहे. महापालिकेने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नोंद (मार्क) गुगल मॅपवर देण्यास सुरवात केल्याने दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृहांची माहिती देणारे दिशादर्शक फलकही पालिकेने विविध रस्त्यांवर लावण्यास सुरवात केली आहे.

शहरातील स्वच्छतागृहांचा मार्ग दाखविण्यासाठी मुंबई महापालिकेने मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले होते. ते फारसे प्रभावी ठरले नसल्याने नवीन पर्यायाचा विचार सुरू झाला होता. त्यातच केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात शहरातील स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवर दिल्यास अधिक गुण मिळणार आहेत. त्यामुळे पालिकेने गुगल मॅपवर स्वच्छतागृह मार्क करण्यास सुरवात केली आहे. गुगल मॅपवर "पब्लिक टॉयलेट'असा सर्च केल्यास नजीकच्या स्वच्छतागृहाचा मार्ग सापडू शकेल.

यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे; तसेच स्वच्छतागृहांची नोंद करण्यासाठी पालिकेने "क्‍वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या कंपनीची नियुक्ती केली आहे. या कामासाठी कंपनीला दोन लाख 33 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यातील एक लाख 86 हजार देण्यात आले आहेत.

हणगदारीसाठी एक पाऊल पुढे
राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज 60 ते 70 लाख नागरिक रोजगार किंवा पर्यटनासाठी मुंबईत येतात. त्यांना स्वच्छतागृह शोधणे जिकिरीचे ठरते. विशेषत: महिलांना खूपच त्रास होतो. मुंबई हागणदारीमुक्त शहर जाहीर करण्यात आले असल्याने स्वच्छतागृहांच्या ठिकाणाची माहिती तातडीने मिळवून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या उपक्रमानुसार सार्वजनिक स्वच्छतागृहांबरोबरच पालिकेचे रुग्णालये, बस स्थानके, उद्याने, मैदाने; तसेच रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची माहितीही गुगल मॅपवर मिळणार आहे.

Web Title: mumbai news toilet searching mumbai municipal