स्वच्छतागृहांचे टॉवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

मुंबई - जागेच्या कमतरतेमुळे मुंबई महापालिकेने शहरात तीन मजली सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षात 18 हजार 818 शौचालये बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही शौचालये बांधण्यासाठी 376 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शौचालयाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी (ता. 15) मंजुरी दिली. 

मुंबई - जागेच्या कमतरतेमुळे मुंबई महापालिकेने शहरात तीन मजली सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षात 18 हजार 818 शौचालये बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही शौचालये बांधण्यासाठी 376 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शौचालयाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी (ता. 15) मंजुरी दिली. 

मुंबईत अपुऱ्या जागेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये शौचालय बांधण्यास जागा मिळत नाही. अनेक ठिकाणी एका शौचालयाचा उपयोग 300 ते 400 रहिवासी करतात. शौचालयांची मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता असतानाही जागेअभावी शौचालय बांधणे शक्‍य होत नाही. त्यामुळे महापालिकेने आता बहुमजली स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 20 वर्षांत पालिकेने एकमजली स्वच्छतागृह बांधले असून, आता दुमजली आणि तीन मजली स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून 15 जानेवारी 2018 पर्यंत कार्यादेश देण्याचे आदेश आयुक्तांनी बुधवारी दिले. 

4500 अतिरिक्त शौचालये 
नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयांसोबतच धोकादायक अवस्थेतील शौचालये पाडून नवी शौचालये बांधण्यात येणार आहेत. उपलब्ध जागेत सध्याच्या आराखड्यानुसार बांधणी केल्यास 11 हजार 170 शौचालये बांधता येतील; मात्र दुमजली आणि तीन मजली स्वच्छतागृहांमुळे तेवढ्याच जागेत तब्बल चार हजार 604 अतिरिक्त शौचालये बांधता येणार आहेत. त्याचबरोबर तीन हजारांहून अधिक नवी शौचालये बांधण्यात येणार आहेत. 

महिलांसाठी मुतारी 
स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी मुतारीही बांधण्यात येणार आहे. तळमजल्यावर अपंग आणि लहान मुलांच्या सोईचे शौचालये बांधण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांचाही विचार यात करण्यात येणार आहे. महिलांसाठी मुतारी उपलब्ध करून देण्यासाठी काही वर्षांपासून "राईट टू पी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या मोहिमेच्या मागणीनुसारच मुतारी बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

तरीही 28 हजार शौचालयांची कमतरता 
मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्येनुसार एक लाख 28 हजार शौचालयांची आवश्‍यकता आहे. प्रत्यक्षात 84 हजार शौचालये अस्तित्वात आहेत. त्यामुळे 44 हजार शौचालयांची अद्याप आवश्‍यकता आहे. येत्या वर्षभरात 18 हजार शौचालये बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरीही मुंबईत 28 हजार शौचालयांची कमतरता राहणार आहे.

Web Title: mumbai news Toilet tower bmc