कल्याणमध्ये वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कल्याण - मुसळधार पावसाने कल्याण पूर्व-पश्‍चिमेतील पूल आणि रस्ते खड्डेमय झाले असून, दुरुस्तीअभावी शहरात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. संथ गतीने वाहतूक सुरू असल्याने शहरातील अनेक भागांत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत. रोजच्या कोंडीच्या त्रासाने वाहनचालकांसह नागरिक संतापले आहेत. 

कल्याण - मुसळधार पावसाने कल्याण पूर्व-पश्‍चिमेतील पूल आणि रस्ते खड्डेमय झाले असून, दुरुस्तीअभावी शहरात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. संथ गतीने वाहतूक सुरू असल्याने शहरातील अनेक भागांत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत. रोजच्या कोंडीच्या त्रासाने वाहनचालकांसह नागरिक संतापले आहेत. 

कल्याण, डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात यंदा पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूरकडे जाणारा वालधुनी पूल, कल्याण पूर्वमधील पूना लिंक रोड, कल्याण नगर महामार्गावरील शहाड पूल, कल्याण पूर्वेतील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल आदी परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असल्याने सकाळी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  कल्याण आणि उल्हासनगर शहरात सोने, कपडे, फर्निचर, फराळ, धान्य आदींची स्वस्त आणि मोठी बाजारपेठ असल्याने कल्याणसह अन्य शहरातील व्यापारी, नागरिक वाहने घेऊन येथे येत आहेत; मात्र खड्डेमय रस्त्यामुळे त्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याचे काम १५ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाचे रस्ते हाती घेणार होतो; मात्र परतीच्या पावसाने कामाला खो घातला. पाऊस थांबताच कामाला सुरुवात करणार आहे.
- प्रमोद कुलकर्णी,  शहर अभियंता, पालिका  

दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्ती व्हावी, यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. शहाड, वालधुनी पुलावर आणि परिसरात भलेमोठे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आमचे कर्मचारी दिवस-रात्र ती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र खड्ड्यांमुळे ती दूर करण्यात अडचणी येत आहेत.
- संभाजी जाधव,  पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक शाखा 

वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत
सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी ४ नंतर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे पालिकेऐवजी पोलिसांना वाहनचालकांचीच बोलणी खावी लागत आहे. रस्ता दुरवस्थेमुळे कोंडीचा प्रश्‍न सोडवताना त्यांना नाकीनऊ आले आहे.

केडीएमटीला फटका
डबघाईला आलेल्या केडीएमटीलाही या खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे फटका बसत आहे. याबाबत अधिकारी वर्गाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवदास टेकाळे यांनी दिली.

Web Title: mumbai news traffic