साडेपाच किलोच्या ट्यूमरची गिनेस बुकमध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात महिलेच्या पोटातून काढलेल्या साडेपाच किलो वजनाच्या ट्यूमरची जगातील "सर्वांत मोठा ट्यूमर' म्हणून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद केली आहे. नऊ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर रुग्णालयाला मंगळवारी (ता. 3) त्याचे सर्टिफिकेट मिळाले. बिहारहून आलेल्या मंजूदेवीच्या पोटातून 26 नोव्हेंबर 2016 ला ट्यूमर काढण्यात आला होता. त्यापूर्वी ती चार वर्षे बिहार आणि मुंबईतील अनेक डॉक्‍टरांकडे उपचार घेत होती; परंतु ट्यूमर वाढत गेला. तो मूत्रपिंडापर्यंत पोचल्याने शस्त्रक्रिया करण्यास कोणताही डॉक्‍टर धजावत नव्हता; परंतु लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्‍टरांनी हे आव्हान स्वीकारले. ट्यूमरमुळे मंजूदेवीला भूक लागत नव्हती. त्यामुळे ती अशक्त झाली होती.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ट्यूमरचा आकार माहीत होता. अशा प्रकारचा ट्यूमर काढताना रुग्णाच्या जीवाला धोका असतो. मंजूदेवीची मुले लहान असल्याने तिला वाचवणे हे एक आव्हान होते. ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया आठ तास चालली. ट्यूमरचे वजन केले. तो साडेपाच किलोचा होता. या शस्त्रक्रियेची गिनेस बुकसाठी नोंदणी केली. त्यासाठी रुग्णाची परवानगी, माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या, रुग्णाचे वैद्यकीय अहवाल, मेडिकल जर्नलमध्ये या केसबद्दल छापून आलेली माहिती इत्यादी पुरावे सादर करावे लागतात. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये "सकाळ'मधील बातमीचे कात्रण होते, अशी माहिती युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजित सावंत यांनी दिली.
रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर म्हणाल्या, 'डॉक्‍टरांच्या या यशाबद्दल मनात आनंद आणि गर्व असे संमिश्र भाव आहेत.''

Web Title: mumbai news tumar