प्रवाशांचे मोडतेय कंबरडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

तुर्भे - तुर्भे येथील उड्डाणपुलाखाली पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये दररोज वाहने आदळत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे. नवी मुंबई महापालिका आणि सायन-पनवेल टोलवेजच्या हद्दवादामुळे येथील रस्त्याच्या दुरुस्तीला वालीच उरलेला नाही. 

तुर्भे - तुर्भे येथील उड्डाणपुलाखाली पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये दररोज वाहने आदळत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे. नवी मुंबई महापालिका आणि सायन-पनवेल टोलवेजच्या हद्दवादामुळे येथील रस्त्याच्या दुरुस्तीला वालीच उरलेला नाही. 

ठाणे-बेलापूर मार्गावरील १८  किलोमीटरच्या पट्ट्याची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे आहे. हे अंतर तुर्भे उड्डाणपुलाखाली संपते. शीव-पनवेल मार्गाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज कंपनीवर सोपवली आहे. पालिका आणि कंपनीच्या हद्दवादात तुर्भे येथील एस. के. व्हिल्सपासून पुढे तुर्भे पोलिस ठाण्यापर्यंतच्या ५००  मीटर रस्त्याला कोणीच वाली नाही. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे रोजच वाहतूक कोंडी होते. तुर्भे पुलाखाली पनवेलकडून येताना सुरुवातीला आणि ठाणे-बेलापूर मार्गावर हुंदाई शोरूमसमोर ५००  मीटर रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. याचा फटका दोन्ही बाजूंच्या वाहतुकीला बसतो. मुंबईकडे येणाऱ्या व गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती कुणी करायची यावरून पालिका आणि टोलवेज कंपनी यांच्यात हद्दीचा वाद आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. सध्या या खड्ड्यांमध्ये रेती टाकून ते बुजवण्याची मलमपट्टी सुरू आहे. परंतु पावसामुळे काही तासांतच हा रस्ता पुन्हा जैसे थे होत आहे. 

सायन-पनवेल महामार्गाचीही दुरवस्था झाली आहे. दरवर्षी कोट्यवधी रस्तेदुरुस्तीवर खर्च केले जात असताना मग त्यांची एवढी दुरवस्था का होते, असा प्रश्‍न त्यामुळे नागरिकांना पडला आहे. तुर्भे येथील एस. के. व्हीलपासून बेलापूर आणि वाशी टोल नाका ते बेलापूर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. दिघा ते तुर्भे एस. के. व्हील शोरूमपर्यंतचा रस्ता पालिकेकडे आहे. त्यामुळे येथे हद्दीचा वाद आहे.

सदर काम हे सायन-पनवेल टोलवेज कंपनीकडे दिले होते; मात्र त्यांना वारंवार सूचना देऊनही सायन-पनवेल मार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. तुर्भे एस. के. व्हीलजवळचा रस्त्याचा भाग महापालिकेकडे आहे.
- सतीश अलगुर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

Web Title: mumbai news turbhe potholes