अंबरनाथ: सराफ दुकानात चोरी करणाऱ्यांना अटक

शर्मिला वाळुंज
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 6 किलो 269 ग्रॅम वजनाचे सुमारे 1 कोटी 70 लाख 65  हजार रुपये किंमतीचा ऐवज आणि 4 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम ठाणे पोलिसांनी जप्त केली.

ठाणे : अंबरनाथ येथील सराफाचे दुकान फोडून 2 कोटी36 लाखाचा ऐवज चोरणाऱया चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ठाणे पोलिस परिमंडळ 4 च्या पोलिसांनी कारवाई करत गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद रामबली सिंग (49) व पारस छबीलदास जुबेलिया (45) यांना शुक्रवारी अटक केली आहे.

त्यांच्याकडून 1 कोटी 70 लाख 65 हजाराचा मुद्देमाल व4 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सह आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौकात असलेल्या सागर सराफाच्या दुकानात रविवारी चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे ग्रील वाकवून त्यावाटे दुकानात प्रवेश करत दुकानातील सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकूण 2 कोटी 36 लाख 70  हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. ही चोरी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. त्यानुसार ठाणे पोलिस परिमंडळ 4 व अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी पोलिसांची विविध पथके तैनात करुन चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

खबऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद सिंग याला पोलिसांनी मिरा रोड येथील त्याच्या रहात्या घरातून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 62 लाख 99हजार रुपये किंमतीच्या 2 किलो 380 ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या लगडी तसेच 25 लाख 95 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. तर बोरीवली येथून पारस जुबेलीया या दुसऱया आरोपीस पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून 81 लाख किंमतीची 6 सोन्याची लगडी जप्त केली.

दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 6 किलो 269 ग्रॅम वजनाचे सुमारे 1 कोटी 70 लाख 65  हजार रुपये किंमतीचा ऐवज आणि 4 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम ठाणे पोलिसांनी जप्त केली.

Web Title: Mumbai news two arrested on thief case