सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी दोन अधिकारी दोषमुक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती चकमकप्रकरणी गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा आणि राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एन. एम. यांना मंगळवारी दोषमुक्त करण्यात आले. सर्वव्यापक विचार केल्यास या दोघांवरील आरोप न पटणारे आहेत, असे निरीक्षण विशेष सीबीआय न्यायाधीश सुनीलकुमार जे. शर्मा यांनी नोंदविले.

सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पाकिस्तानमधील लष्करे तैयबा या दहशतवादी गटाशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीन हा गांधीनगरजवळ एका चकमकीत मारला गेला होता. त्याची पत्नी त्यानंतर गायब झाली होती. तिलाही ठार मारण्यात आल्याचा आरोप होता. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापती याने ही चकमक पाहिली होती. मात्र डिसेंबर 2006 मध्ये छपरी गावाजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत तोही मारला गेला होता. या चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा हात असल्याचेही आरोप झाले होते.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पोलिस उपमहानिरीक्षक असलेल्या वंजारा यांना 24 एप्रिल 2007 रोजी अटक केली होती. सीबीआयच्या तपासात निष्पक्षपातीपणा असावा, या कारणासाठी सप्टेंबर 2012 मध्ये हे प्रकरण मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाकडे सोपविण्यात आले होते.

न्याय मिळाला - वंजारा
मुंबई उच्च न्यायालयाने वंजारा यांना या प्रकरणात सप्टेंबर 2014 मध्ये जामीन दिला होता. न्यायालयाचा निकाल ऐकून अखेर या प्रकरणात न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया वंजारा यांनी दिली. आतापर्यंत या प्रकरणात 16 जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

Web Title: mumbai news Two officers guilty of Sohrabuddin encounter case