उल्हासनगरमधील 511 जिन्स उद्योगांवर कुऱ्हाड? 

उल्हासनगरमधील 511 जिन्स उद्योगांवर कुऱ्हाड? 

उल्हासनगर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वालधुनी नदीला प्रदूषित करणारे उल्हासनगरातील 511 जिन्स कारखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा पवित्रा पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला आहे. त्यामुळे जिन्स उद्योगांचा संसार उठणार असून, सुमारे 75 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 

उल्हासनगरमध्ये 511 जिन्स कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये जिन्स पॅन्टवर रसायनिक प्रक्रिया होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाने मंगळवारी वनशक्ती या सामाजिक संघटनेच्या जनहित याचिकांवर झालेल्या सुनावणीत प्रदूषण नियंत्रण महामंडळ, उल्हासनगर महानगरपालिका आणि वीज मंडळाला हे जिन्स कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. जिन्स वॉश संघटनांनी ईटीपी प्लांट लावणार असल्याचे सत्यप्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर या संघटनेने कोणतीही उपाययोजना न करता वालधुनी नदीत होणारे प्रदूषण चालूच ठेवले. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात वालधुनी नदीच्या प्रदूषणाबाबत झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कारखाने बंद करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी येत्या 21 नोव्हेंबरला जिन्स वॉशचा उद्योग करणाऱ्या कारखानदारांची टाऊन हॉल येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत जिन्स कारखानदारांनी स्वतःच त्यांचे काम बंद करून ईटीपीची सुविधा असलेल्या ठिकाणी कारखाने विस्थापित करण्याबाबत आयुक्त सांगणार आहेत. त्यानंतरही कारखाने तेथून न हलल्यास 1 डिसेंबरपासून महापालिका प्रशासन पाणी जोडणी आणि कुंपणनलिका जोडणी तोडणार आहे. वीज मंडळामार्फत वीज जोडणी कापण्यात येणार आहे. यानंतरही कारखाने सुरू राहिल्यास कारखान्यांची बांधकामे बेकायदा असल्याने त्यांच्यावर बुलडोझर फिरविण्यात येईल, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला. 

मुळात वालधुनीला दूषित प्रदूषित करण्याचे काम एमआयडीसीतील केमिकल कंपन्या करतात. आमचे वॉशचे पाणी असते त्यात कलर असतो. शहरात वॉश कारखाने, शिलाई मशीन, कटिंग, धागे काढणे, चेन लावणे, बटन लावणे, इस्त्री असे सुमारे 75 हजार कामगार काम करतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशापुढे कुणी जाणार नाही; पण यातून बाहेर कसे पडावे, रोजगार कसा टिकून राहील. यासाठी 21 तारखेच्या बैठकीत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे साकडे घालणार आहे. 
- परशुराम पाटील, अध्यक्ष, जिन्स वॉश असोसिएशन 

सर्वोच्च न्यायालयाचे जिन्स वॉश कारखान्यांबाबत काय निर्देश आहेत, ते वाचल्यावर पुढील रणनीती ठरवणार आहे. 
- आमदार डॉ. बालाजी किणीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com