मुंबई विद्यापीठाची विश्‍वासार्हता धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठावर निकालांबाबतच्या गोंधळाचा ठपका कायम असताना बुधवारी अफवांमुळे विद्यापीठ चर्चेत राहिले. विविध विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलल्याच्या अफवांना उधाण आले होते. परंतु, या केवळ अफवाच असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. सीए परीक्षेसह येणाऱ्या वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. अन्य परीक्षांच्या वेळेत बदल झालेला नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

बुधवारी फोर्ट संकुलात विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंची भेट घेऊन निकालांतील गोंधळाबाबत ठाम निर्णय घेण्याची मागणी लावून धरली. हा वाद सोडवण्यात विद्यापीठाचे प्रशासन गुंतलेले असताना आगामी सत्र परीक्षांचे वेळापत्रक बदलल्याची चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर याविषयीचा मजकूर फिरू लागला. वाणिज्य, अभियांत्रिकी व कला शाखेच्या वेळापत्रकांत बदल केल्याचे संदेश विद्यार्थ्यांच्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर फिरू लागले. परीक्षांना काही दिवस शिल्लक असताना वेळापत्रक बदलल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर प्राध्यापकांकडे याबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन विद्यापीठाने केले.

Web Title: mumbai news The University of Mumbai risks the credibility