उरणच्या मुसळधार पावसाने झोडपले, चिरनेरमध्ये घर कोसळले

राजकुमार भगत
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

उरण शहरात जोरदार पावसाने वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, आपला बाजार ते साठे हॉटेल, एनआय हायस्कूल, गणपती चौक आदी रस्त्यांवर पाणी साचले होते.

उरण - गणपती सुरू झाल्यापासून पावसाने उरणला झोडपून काढले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उरण शहर आण परिसरातील काही गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जेएनपीटी परिसरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली होती.

ग्रामीण भागात चिरनेर, भेंडखळ, नवघर, करंजा आदी गावात देखिल पुराचे पाणी गावात शिरले होते. तर जेएनपीटी परिसरातील काही रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत होती.

या मुसळधार पावसात चिरनेर मधील एक घर पडले आहे. चिरनेर गावातील तेलीपाडा येथील अशोक मसणाजी नारंगीकर आणि रामनाथ मसणाजी नारंगीकर यांच्या मालकीचे हे घर होते. सतत पडत असलेल्या पावसाचे पाणी भिंतीमध्ये झिरपल्याने घराच्या भिंती कमकूवत होवून हे घर कोसळले. या घरात दोन कुटूंबे राहत होती. सुदैवाने घरात राहणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नसली तरी घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांनी घरातील माणसांना बाहेर काढले. या घराची भिंत शेजारी राहणाऱ्या रघुनाथ नारंगीकर यांच्या घरावर कोसळल्यामुळे त्या घराचे देखिल नुकसान झाले आहे. सोमवार ता.28 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे घर पडले. मात्र तिन-चार तास उलटून गेले तरी कोणीही शासकीय अधिकारी या ठिकाणी पहाणी करण्यासाठी आलेला नव्हता. तर या पडलेल्या घराच्या काही भिंती अर्धवट अवस्थेत पडलेल्या असल्यामुळे त्या धोकादायक झाल्या होत्या. मात्र हा भाग चिंचोळा असल्याने त्या भिंती पाडण्यात अडचणी येत होत्या.

Web Title: mumbai news uran rains house collapsed