बनावट पासपोर्टद्वारे दोन मुले अमेरिकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - बनावट पासपोर्टद्वारे दोन लहान मुलांना अमेरिकेत पाठवणाऱ्या तिघांना बीकेसी पोलिसांनी रविवारी (ता. 18) अटक केली. जाकीर युसूफ शेख, विकी ऊर्फ फिरोज शेख आणि रियाज नागपूरवाला अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

मुंबई - बनावट पासपोर्टद्वारे दोन लहान मुलांना अमेरिकेत पाठवणाऱ्या तिघांना बीकेसी पोलिसांनी रविवारी (ता. 18) अटक केली. जाकीर युसूफ शेख, विकी ऊर्फ फिरोज शेख आणि रियाज नागपूरवाला अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

काही दिवसांपूर्वी एका दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. यातील आरोपीने बनावट पासपोर्टद्वारे अमेरिकेत नोकरीकरता व्हिसा तयार केला होता. त्यानंतर त्याने अमेरिकेत फिरण्याकरता पत्नीचा आणि दोन मुलांचाही टुरिस्ट व्हिसा तयार केला. अटक आरोपीने बनावट कागदपत्रांद्वारे व्हिसा तयार केल्याचे अमेरिकेतील दूतावासाच्या निदर्शनास आले. त्यांनी व्हिसा रद्द केला. त्यानंतर एप्रिलमध्ये या प्रकरणातील महिलेने देशातील एका प्रमुख विमानतळावरून दोन मुलांना अमेरिकेत नेले; मात्र ती महिला एकटीच मुंबईत परतली. हा प्रकार अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती मुंबईतील अमेरिकन दूतावासाला दिली. त्यांनी बीकेसी पोलिसांना चौकशीची विनंती केली. पोलिसांनी संबंधित महिलेच्या घराची तपासणी केली असता, तिची मुले घरीच होती. त्या वेळी तिच्या दोन मुलांच्या पासपोर्टद्वारे एका राज्यातील दोघा मुलांना संबंधित महिलेने अमेरिकेत नेले होते, असे उघडकीस आले. याप्रकरणी दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्यांचे पारपत्रही जप्त केले. 

तपासादरम्यान विमानाचे तिकीट तयार करणे, मुलांना अमेरिकेत नेण्याकरता पैसे पुरवल्याचे समोर आले. तांत्रिक माहितीद्वारे पोलिसांनी युसुफ, विकी आणि रियाजला रविवारी अटक केली. तिघांची कसून चौकशी केली. त्यांनी बनावट पासपोर्टद्वारे दोन मुलांना अमेरिकेत पाठवल्याचे तपासात उघड झाले. अटक आरोपी हे बनावट पासपोर्ट तयार करून संबंधितांना परदेशात पाठवण्याचे काम करायचे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता आहे. काही दिवसांपूर्वी सहार पोलिसांनी अवैध मानवी वाहतुकीचा पर्दाफाश केला होता.

Web Title: mumbai news US fake passports

टॅग्स