व्हॅलेंटाइन डेनिमित्त कैद्यांची मुलांबरोबर "गळाभेट'

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई - व्हॅलेंटाइन डे म्हणजे, प्रेमाचा दिवस. त्यामुळे अनेक जण, आपली प्रिय व्यक्‍ती, आप्त-स्वकियांसोबत हा दिवस घालवतात; पण कैद्यांसाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच रुक्ष असतो, हे जाणून भायखळा तुरुंगातील कैद्यांसाठी व्हॅलेंटाइन डेनिमित्त बुधवारी (ता. 14) "गळाभेट' हा अनोखा उपक्रम होणार आहे. यानुसार महिला-पुरुष कैद्यांना तरुंगात पहिल्यांदाच त्यांच्या मुलांना भेटता येणार आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी पाळणाही सजविण्यात आला आहे. या "गळाभेट'साठी 50 जणांचे अर्ज तुरुंग प्रशासनाकडे आले आहेत.
भायखळा तुरुंगात सध्या 510 महिला आणि पुरुष कैदी आहेत.

सामाजिक संघटनांच्या मदतीने काही वेळा कैदी आणि त्यांच्या मुलांची भेट होते; पण यंदा जिल्हा पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग, मुंबई आणि तुरुंग प्रशासनाने भायखळा तुरुंगात अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचे ठरवले आहे. पहिल्यांदाच दोन्ही यंत्रणांनी असा उपक्रम हाती घेतला आहे. "गळाभेटी'दरम्यान 16 वर्षांखालील मुलांना त्यांच्या पालकांना भेटता येणार आहे. काही मिनिटांची ही भेट कैद्यांना मानसिकदृष्ट्या आधार देणारी ठरते. गळाभेटीकरिता तुरुंगातील एक पाळणाही सजविण्यात आला आहे. त्या पाळण्यावर बसून महिला कैदी आपल्या मुलांसोबत काही क्षण सोबत घालवतील, असा यामागील उद्देश आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नातेवाइकांबरोबर भेट न झाल्याने अनेक कैद्यांना नैराश्‍याने ग्रासले जाते. त्यामुळे काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. याची गंभीर दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "कैद्याची गळाभेट' हा उपक्रम तुरुंगात सुरू केला आहे.

Web Title: mumbai news valentine day accused child meeting