मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 जून 2017

मुंबई - संतप्त शेतकऱ्यांचा राज्यातील काही भागांत अजूनही संप सुरूच असल्याने मुंबईत भाज्यांचे भाव भडकले आहेत. रविवारच्या सुटीनिमित्त फेरीवाले व मार्केटमध्ये खरेदीची गर्दी होते; मात्र भाज्यांच्या तुटवड्यामुळे हे बाजार ओस पडल्याचे चित्र होते. मुंबईला भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही भाववाढ कायम राहण्याची भीती आहे. दरम्यान, उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या तोंडावर मुंबईकडे येणारा शेतमाल कमालीचा घटण्याची शक्‍यता आहे. संपामुळे मुंबईतील आठवडे बाजारातही आज शुकशुकाटच होता. 

मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी संध्याकाळपासून रविवार सकाळपर्यंत 304 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली आहे, तर 259 गाड्या फळांचीही आवक झाली आहे. विशेष म्हणजे, रविवार असल्याने अशीही भाज्यांची आवक कमी असते. त्यामुळे ही आवक स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एरवी मुंबईत सरासरी पाचशे ट्रक भाजीपाला लागतो. तसेच कांदा-बटाटा आणि फळांचे सुमारे 400 ते 500 ट्रक येत असतात. सध्या ही आवक निम्म्यापर्यंत घटली आहे. रविवारी मुंबईकर मांस, मच्छी खाण्यावर अधिक भर देतात. त्यामुळेही भाजीपाल्याला मागणी कमी असते. तसेच मुंबईतील दादर, भायखळा येथील बाजारही रविवारी बंद असतात; मात्र नेहमीच्या तुलनेत आवक घटल्यामुळे मुंबईत भाज्यांचे भाव चढेच आहेत. टोमॅटोचा भाव सुमारे 70 ते 100 रुपयांवर गेला होता. 

दूध पुरवठ्यावर फारसा परिणाम नाही 
नवी मुंबईत बहुतांश दूध संघांचे शीतकरण प्रकल्प असल्याने या ठिकाणी काही प्रमाणात दुधाचा साठा उपलब्ध असतो. तसेच सध्या पोलिस बंदोबस्तात दुधाची वाहतूक होत असल्याने अद्याप तरी दूधपुरवठ्यावर फारसा परिणाम जाणवत नाही. त्यामुळे मुंबईत दूधपुरवठा सुरळीत सुरू आहे. दूध वाहतुकीत काही अडचणी निर्माण झाल्या तरच मुंबईतील दूधपुरवठ्यावर परिणाम होईल, असे सांगण्यात आले. मुंबईला दररोज ऐंशी लाख लिटर दुधाची आवश्‍यकता भासते. त्यापैकी 55 लाख लिटर पॅकबंद पिशवीतून वितरित होते, तर उर्वरित 25 लाख लिटर सुटे विकले जाते.

Web Title: mumbai news vegetable