मुंबईत भाजीपाला व दूध कोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपाने राजधानी मुंबईची भाजीपाला व दूध कोंडी होण्याचे आज स्पष्ट झाले. या संपाच्या झळा आजपासूनच मुंबईला बसण्यास सुरवात झाली असून, उद्यापासून (ता. 3) दूध व भाजीपाला टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची भीती आहे. सरकारने गुजरात व कर्नाटकमधून मुंबईला दूधपुरवठा करण्याची तयारी केली असली, तरी दर लिटरला दहा ते बारा रुपयांची भाववाढ झाल्याने मुंबईकरांना दरवाढीचा दणका बसला आहे.

कल्याण व नवी मुंबईच्या बाजारपेठेत शेतमालाची आवक कमालीची घटली. कल्याण मार्केटमध्ये सरासरीच्या 25 टक्‍केच आवक झाली, तर नवी मुंबई एपीएमसीमध्ये 20 ते 22 टक्‍केच आवक झाली.

पालेभाज्यांचा एकही ट्रक अथवा टेंपो कल्याणमध्ये येऊ शकला नाही. कांदा, बटाटा, फळे व अन्नधान्याचे काही ट्रक व टेंपो मात्र दाखल झाले.
दुधाच्या बाबतीत मात्र प्रचंड टंचाईची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. "महानंद' या राज्याच्या दुध संघाकडे आज 60 टक्‍के तुटवडा आला आहे. आज फक्‍त 20 हजार लिटर दूध "महानंद'कडे आले. पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या दुध पुरवठादार जिल्ह्यांत 90 टक्‍के दूधसंकलनच होऊ शकले नाही. मुंबईला दररोज 50 ते 60 लाख लिटर दुधाची गरज आहे.

कडाडते भाव...
- दूध : 40 वरून 60 रुपये लिटर
- मेथी : 100 रुपये पेंडी
- गवार : 60 रुपये किलो
- कोबी : 50 रुपये
- भेंडी : 60 रुपये
- सिमला मिरची : 60 रुपये

- दुधाचा 60 टक्‍के तुटवडा
- पालेभाज्यांचा एकही ट्रक नाही
- गुजरात, कर्नाटकमधून दुधाची आयात

Web Title: mumbai news vegetable & milk problem in mumbai