विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला सज्जड दम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

तुर्भे - खाद्यपदार्थ जादा दराने विकून ग्राहकांची लूट केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम नवी मुंबई महापालिकेने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला दिला आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचाही आदेश पालिकेने दिला आहे.

तुर्भे - खाद्यपदार्थ जादा दराने विकून ग्राहकांची लूट केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम नवी मुंबई महापालिकेने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला दिला आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचाही आदेश पालिकेने दिला आहे.

नवी मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी असलेले शहरातील वाशीतली एकमेव भावे नाट्यगृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नाट्यगृहात सोई-सुविधांची वानवा असतानाच तेथील उपाहारगृहचालकही खाद्यपदार्थ जादा दराने विकून प्रेक्षकांची आर्थिक लूट करत आहे. याबाबत सौरभ पांड्या यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन पालिकेने नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

भावे नाट्यगृहात सुरुवातीच्या काळात आसनव्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, रंगभूमीवरील साऊंड, प्रकाशव्यवस्था दर्जेदार होती. त्यामुळे भावे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. मात्र गेल्या काही वर्षांत येथील सुविधांचा बोजवारा उडाला. नाट्यगृहाच्या कामांमधून टक्केवारी मिळत नसल्याने पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याची दुरवस्था झाली, असे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात नवी मुंबई मनसेने आंदोलने केल्यानंतर पालिकेने दुरुस्तीची मलमपट्टी केली. त्यामुळे काही दिवसांतच येथील परिस्थिती जैसे थे झाली आहे. येथील तिकीट बुकिंगमध्येही मोठा भ्रष्टाचार होतो. सुट्टीच्या दिवशी बोगस शोसाठी जास्त पैसे उकळले जातात, असा आरोप वाशीतील रसिकांनी केला आहे. पहिल्या रांगेतील तिकीट ३०० ते ४०० रुपये असते. एवढे पैसे मोजून रसिकांना तुटक्‍या खुर्च्यांवर बसावे लागते. मच्छरांचा त्रास होतो. वातानुकूलित यंत्रणा बंद असते. त्यामुळे रसिकांनीही नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे नाटक, ऑर्केट्रा व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करणाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एकीकडे हा प्रकार सुरू असताना येथील कॅंटीनचालकानेही रसिकांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे कोपरखैरणे येथील सौरभ पांड्या यांनी याची तक्रार पालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापन उपायुक्तांकडे केली. त्यांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आणि सात दिवसांत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.

आंदोलनांकडे दुर्लक्ष
विष्णुदास भावे नाट्यगृहातील समस्यांबाबत अनेकांना आंदोलने केली. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीची आश्‍वसने दिली. नंतर जुजबी कामे केली. परंतु या नाट्यगृहाच्या सर्व समस्या सोडवण्याकडे मात्र दुर्लक्षच केले आहे. 

Web Title: mumbai news vishnuda bhave Theater