पाण्यासाठी पुन्‍हा धावाधाव!

पाण्यासाठी पुन्‍हा धावाधाव!

नवी मुंबई - पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा पाणीपुरवठ्यासाठी नवी मुंबई महापालिकेला साकडे घातले आहे. पनवेल शहराला आवश्‍यक २५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची मागणी पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नवी मुंबईचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्याकडे केली आहे, मात्र माणुसकीच्या नात्याने २५ ऐवजी १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यास तयार असल्याचे संकेत आयुक्त रामास्वामी यांनी दिले आहेत. 

राजकीय हेतूपोटी जन्माला आलेल्या पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून पनवेल शहराची तहान भागवली जात नाही. त्यामुळे पनवेल शहराची तहान भागवण्यासाठी एमजेपी, एमआयडीसी यांच्यावर पनवेल महापालिकेला मागील अनेक वर्षांपासून अवलंबून राहावे लागत आहे. अशातच ऐन उन्हाळ्यात पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमजेपी व एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरील ताण वाढला असल्याने पनवेलकरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी २५ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सध्या जमेल त्याठिकाणी पनवेल पालिका टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु ही खर्चिक बाब असल्याने दुसरा पर्याय उपलब्ध होईपर्यंत शेजारच्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाचे पाणी वापरण्याचा पर्याय आयुक्त शिंदे यांनी शोधला आहे. पनवेल शहराजवळून जाणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिन्यांमधून पनवेलला पाणीपुरवठा करणे सोईचे ठरणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेने नवी मुंबईकडे २५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली आहे; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यास नवी मुंबईचे आयुक्त रामास्वामी यांनी नकार दिला आहे. आणीबाणीच्या वेळेत पनवेल महापालिकेने माणुसकीच्या धर्तीवर १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करता येईल, असे रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे. मोरबे धरणावर पहिला अधिकार नवी मुंबईच्या जनतेचा असल्याने यापेक्षा अधिक पाणी देण्यावर विचार करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. रामास्वामींच्या या स्पष्टीकरणामुळे शिंदेंची धावपळ झाली असून पाण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडण्यास सुरुवात केली आहे. 

पाण्यासाठी दुसऱ्यांदा मागणी
नवी मुंबई महापालिकेकडे पनवेल महापालिकेने सलग दुसऱ्यांदा मागणी केली आहे. याआधी तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र निंबाळकर हे नवी मुंबईच्या प्रभारी आयुक्तपदी असताना त्यांनी थेट नवी मुंबईचे पाणी पनवेलला वळवण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. यानंतर त्यांच्या जागी आयुक्तपदी आलेल्या डॉ. सुधाकर शिंदे यांनी नवी मुंबईकडे पाण्याची मागणी केली होती. पनवेलला पाणी देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून तसा प्रस्तावही तयार केला होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महासभेत याला जोरदार विरोध केल्यामुळे पनवेलचे तोंडचे पाणी पळाले होते. आता पुन्हा शिंदेंनी पाण्यासाठी जोर लावला असून तो पूर्ण होईल की नाही, यावर पनवेलकरांच्या पाण्याचे भवितव्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com