रात्रशाळा शिक्षकांबाबत राजकारण कशासाठी? - रामनाथ मोते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - रात्रशाळांतून निवृत्त झालेल्या राज्यातील हजारो शिक्षकांसह अर्धवेळ काम करणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्‍नावर राजकारण करू नका, अशी टीका कोकण विभागाचे माजी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे नाव न घेता केली. रात्रशाळांच्या शिक्षकांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांच्या हिताच्या मागण्या करण्याऐवजी दोन-दोन ठिकाणी पगार आणि सवलती घेणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी शिक्षक आमदारांनी उभे राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

रात्रशाळा बंद पाडल्या जात आहेत. अनेक शिक्षकांना नोकरीतून काढले जात आहे, असे आरोप कपिल पाटील करत असून, यात कोणतेही तथ्य नाही, असे मोते यांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले. शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी रात्रशाळांविषयी निर्णय घेऊन या शाळांमध्ये दुबार नोकरी करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यातील बहुतांश शिक्षक सकाळी अनुदानित, विनाअनुदानित शाळांवर पूर्णवेळ शिक्षक असून, ते सरकारच्या पेन्शन, सेवानिवृत्ती, ग्रॅच्युईटी आदींचा लाभ घेतात; मात्र याच शाळांत अनेक वर्षांपासून असलेले अर्धवेळ शिक्षक कोणत्याच लाभाला पात्र ठरत नसल्याने त्यांच्यावर कायम अन्याय होत आहे. या प्रश्‍नाकडे पाटील यांनी कायम दुर्लक्ष केले, असा आरोप मोते यांनी केला.

दिवसा शाळेत आणि रात्री अर्धवेळ रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना तत्त्वत: कोणताही विरोध नाही; परंतु केवळ रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतरांची पगार आणि इतर सुविधांसाठी होणारी परवड लक्षात घेतली पाहिजे, असे मोते म्हणाले.

उच्च व माध्यमिक रात्रशाळा
विभाग - संख्या

मुंबई 137
नाशिक 3
पुणे 14
कोल्हापूर 5
औरंगाबाद 2
लातूर 11
अमरावती 3
एकूण 176
रात्रशाळांत काम करणारे शिक्षक - 351
कर्मचाऱ्यांची संख्या - 239
दिवसा शाळेत काम करून पुन्हा रात्रशाळांतही नोकरी करणारे शिक्षक ः 1 हजार 10
शिक्षकेतर कर्मचारी - 348
रात्रशाळांतील विद्यार्थी - 17 हजार 574
विद्यार्थिनींची संख्या - 4 हजार 760

Web Title: mumbai news What about politics for night school teachers?