अनाथ होता होता वाचला हरवलेला मुलगा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मूल हरवल्यानंतर त्याची तक्रार पोलिस ठाण्यात तक्रार करणे आवश्‍यक असते. त्यामुळे बाळाला शोधणे सोपे जाते. हरवलेल्या मुलांना आई-वडिलांचे नाव-पत्ता सांगता येत नसल्याने पोलिस सोशल वर्करची मदत घेतात. 
- सुनील अरोरा, बाल आशा ट्रस्ट

मुंबई - हरवलेल्या तीन वर्षांच्या मोहनने (नाव बदलले) व्हॉट्‌सऍपवर आईचा फोटो पाहिला आणि त्याच्या ओठांतून "अम्मा' शब्द बाहेर पडला. तो अनाथ होता होता वाचला. 

आठवड्यापूर्वी बाल आशा संस्थेच्या ऑफिसमधला फोन खणाणला. पोलिसांनी 2-3 वर्षांच्या बाळाबद्दल विचारणा केली. बाल आशामध्ये या बयाचे बाळ आलेले नव्हते. पोलिसांना त्यांनी तसे कळवले. त्यानंतर बाल आशाचे कार्यकारी संचालक सुनील अरोरा यांना त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या सोशल वर्करचा फोन आला. तिने रेल्वे पोलिसांकडून 2 ते 3 वर्षांचे मूल येत असल्याचे कळवले. सोशल वर्कर आणि पोलिसांनी केलेल्या बाळाच्या वर्णनात साम्य असल्याने सुनील यांनी सोशल वर्करला बाळाची माहिती पोलिस ठाण्यात देण्याची सूचना केली. 

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे फोटो संस्थेच्या सोशल वर्करला पाठवले. सोशल वर्करच्या व्हॉट्‌सऍपवर आलेले ते फोटो त्या छोट्या मुलाला दाखवण्यात आले. त्याने आईचा फोटो ओळखला आणि "अम्मा' अशी हाक मारली. हरवलेल्या बाळाला त्याची आई आणि आईला तिचे बाळ मिळाले होते. सुनील म्हणाले, बाळाने आईला ओळखल्यानंतरही दोन दिवस त्याला घरी जाता आले नाही. पोलिस, बाल विकास समिती आणि इतर संबंधित परवानग्या मिळाल्यानंतर कोर्टाने बाळाला आईच्या ताब्यात दिले. या प्रक्रियेला दोन दिवस लागले. बाल आशा संस्थेने या महिन्यात अशा दोन मुलांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. 

Web Title: mumbai news whatsapp