
Mumbai News : पोटात ११ किलोचा मांसाचा गोळा वर्षभर घेऊन फिरत होती महिला; डॉक्टरांनी केली सुटका
मुंबईतली एक महिला गेल्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होती. निदानानंतर लक्षात आलं की, या महिलेच्या पोटात तब्बल ११ किलो वजनाचा मांसाचा गोळा होता. हा दुर्मिळ प्रकार असून ही शस्त्रक्रिया अवघड आणि गुंतागुंतीची होती. मात्र महानगरपालिकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आहे.
मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५२ वर्षे वय असणारी एक महिला, रजोनिवृत्तीनंतरची पोटदुखीची तक्रार घेऊन घाटकोपर इथल्या महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात आली. तेथे स्त्री-रोगतज्ञ डॉ. स्वाधीना मोहंती यांनी रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाच्या पोटाचे आकारमान प्रमाणाबाहेर वाढल्याचं आढळलं.
त्यामुळे लागलीच सोनोग्राफी आणि एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात गर्भाशयात मोठं फायब्रॉईड असल्याचं आढळून आलं. ज्यामुळे रक्तवाहिन्या, आतडी आणि मूत्राशयाची जागा थोडी बदलली होती. त्यामुळे या महिलेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. तसंच रक्तक्षय व हायपोथायरॉईडचा आजार देखील झाला होता. त्यामुळे या महिलेला नीट झोपताही येत नव्हतं.
रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रिया करून ११ किलोचा फायब्रॉईड काढून टाकला. ही शस्त्रक्रिया करत असताना मोठ्या रक्तवाहिन्या सुरक्षित करण्यासाठी तसेच मूत्रवाहिनी आणि मूत्राशय हे दोन्ही सुरक्षित राखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्य पणाला लावून शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव अपेक्षेपेक्षा कमी झाला आणि रुग्णाच्या जीविताला कोणताही धोका पोहोचला नाही.
आता ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आता पोटात खूप हलके आणि एकूणच छान वाटते आहे. पोटाच्या गाठीतील वजनामुळे, त्यातून येणाऱ्या अस्वस्थतेमुळे मागील एक वर्षभर पुरेशी झोप घेता आली नव्हती. आता पूर्णपणे बरे झाल्यानंतर झोप पुरेशी लाभत असून त्यामुळे आयुष्य पुन्हा आनंदी झाले असल्याचे या महिलेने सांगितलं.