‘बायकांना का नाही’ला हवा मदतीचा हात

हर्षदा परब
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - ‘जहा सोच वही शौचालय’चा प्रसार केंद्र सरकार करतेय. घरोघरी शौचालय बांधण्यासाठी राज्य सरकारही आग्रही अाहे. त्याच विषयावर रंगभूमीवर ‘बायकांना का नाही’ नाटक येऊ घातलेय; परंतु त्याला मदतीचा हात मिळत नसल्याने कलाकार खंत व्यक्त करीत आहेत. सरकारी यंत्रणांनी आमच्या नाटकाला पाठिंबा द्यावा आणि शौचालयासारखा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी, अशी मागणी नाटकाशी जोडलेला प्रत्येकजण करत आहे.

मुंबई - ‘जहा सोच वही शौचालय’चा प्रसार केंद्र सरकार करतेय. घरोघरी शौचालय बांधण्यासाठी राज्य सरकारही आग्रही अाहे. त्याच विषयावर रंगभूमीवर ‘बायकांना का नाही’ नाटक येऊ घातलेय; परंतु त्याला मदतीचा हात मिळत नसल्याने कलाकार खंत व्यक्त करीत आहेत. सरकारी यंत्रणांनी आमच्या नाटकाला पाठिंबा द्यावा आणि शौचालयासारखा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी, अशी मागणी नाटकाशी जोडलेला प्रत्येकजण करत आहे.

चार वर्षांपूर्वी महाविद्यालयीन स्पर्धेसाठी तयार झालेली आणि स्पर्धा गाजवलेली ‘बायकांना का नाही’ एकांकिका नाट्यरूपात तयार आहे. ‘एज्युकेशन’, ‘लवगुरू’ आणि ‘कॉमेडी एक्‍स्प्रेस’साठी काही स्क्रिप्ट लिहिलेल्या राजेश कोळमकर यांनी त्याचे लेखन केले आहे. अक्षय अहिरे याने नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. ‘कोरो’च्या फेलोशिपसाठी ‘राईट टू पी’ विषयावर काम करताना मुमताज शेख हिने सुचविल्यानंतर त्या विषयावर एकांकिका लिहिली आणि अक्षयच्या सांगण्यावरून तिचे नाटकात रूपांतर केले. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधणे हा हेतू आहे, असे राजेश कोळमकर यांनी सांगितले. आजवर शौचालय किंवा नैसर्गिक विधी हा विषय विनोद म्हणूनच आला आहे; पण आमच्या नाटकात विनोदाच्या माध्यमातून त्या विषयाचे गांभीर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शौचालयाविना होणारी स्त्रियांची कोंडी, त्यांच्या आरोग्याच्या समस्या, समानता आदी विषयांवर नाटक विनोदातून भाष्य करते, असेही ते म्हणाले.

प्रसिद्धी-पैशापेक्षाही शौचालयाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून एकांकिकेचे नाटक करण्याचा आग्रह धरला, असे अक्षय अहिरेने सांगितले. तो म्हणाला, की आमच्या नाटकात कोणीही मोठा कलाकार नाही. त्याला निर्माताही नाही; पण ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी कोणी तरी पुढे येणे आवश्‍यक आहे. आता नाटकाच्या पहिल्या प्रयोगाकडे पाहतो आहे.

‘राईट टू पी’ साठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतेय. देश हागणदारीमुक्त व्हावा, म्हणून सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जाहिराती, मोहिमा सुरू आहेत. सारखीच उद्दिष्टे घेऊन आपण सगळे काम करतो आहोत. सरकारच्या स्वच्छ भारत जनजागृतीच्या मोहिमेत ‘बायकांना का नाही’ नाटकाचा समावेश व्हावा; जेणेकरून हा विषय आणि शौचालयांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल.
- सुप्रिया सोनार (कार्यकर्त्या, राईट टू पी)

पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरात
अजातशत्रू हा मुंबईचा ग्रुप ‘बायकांना का नाही’ नाटकाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरमध्ये १५ सप्टेंबरला दुपारी ३ ते ६ या वेळेत सादर करणार आहे. या नाटकाचे निमंत्रण सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. कोरो आणि एसएनडीटी वुमन युनिव्हर्सिटी (जुहू)चे रिसर्च सेंटर ऑफ वुमन स्टडीज यांच्या मदतीने पहिला प्रयोग रंगभूमीवर होणार आहे.

Web Title: mumbai news women