क्‍लिप, ब्लेडच्या मदतीने लोकलमध्ये प्रसूती

हर्षदा परब
मंगळवार, 25 जुलै 2017

माणुसकीसाठी केले; पण आता भीती वाटतेय. हातात ग्लोज न घालता ही प्रसूती केली. असे करताना संसर्गाचा धोका असतो. एचबीएसएजी संसर्गापासून बचाव करणारी लस घेतली आहे, पण एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये, म्हणून कोणतीही लस नाही. त्या महिलेची प्रसूती करणे, एवढेच उद्दिष्ट होते.
 - संगीता पवार, परिचारिका, कोहिनूर रुग्णालय.

संगीता पवार यांनी वाचवले दोन जीव 

मुंबई - सकाळच्या ड्युटीसाठी कल्याणहून लोकलने मुंबईला निघाली असताना समोरच्या बाकावर  गर्भवती अस्वस्थ दिसली. तिची अस्वस्थता वाढू लागली. तपासणी केली, असता तिची प्रसूतीची वेळ जवळ आल्याचे लक्षात आले.

क्षणाचाही विलंब न करता प्रसूतीचा निर्णय घेतला. त्यात यशही आले. नाळ बांधण्यासाठी केसांच्या क्‍लिपचा तर ती कापण्यासाठी ब्लेडचा उपयोग झाला. दोन जीवांच्या जीवनमरणाच्या घटिकांचा अनुभव कथन करत होत्या कोहिनूर रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील परिचारिका  संगीता पवार!

संगीता यांनी शिक्षण घेत असताना त्यांनी १९९८ मध्ये पहिली आणि नंतर २००१ मध्ये वाडिया रुग्णालयात प्रसूती केली होती. त्यानंतर थेट शनिवारी (ता. २२) त्यांनी लोकलमध्ये सोनी येलमकठी या महिलेची प्रसूती केली. तिला डोंबिवलीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला मुलगी झाली आहे. दोघेही सुखरूप आहेत.

माणुसकीसाठी केले; पण आता भीती वाटतेय. हातात ग्लोज न घालता ही प्रसूती केली. असे करताना संसर्गाचा धोका असतो. एचबीएसएजी संसर्गापासून बचाव करणारी लस घेतली आहे, पण एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये, म्हणून कोणतीही लस नाही. त्या महिलेची प्रसूती करणे, एवढेच उद्दिष्ट होते.
 - संगीता पवार, परिचारिका, कोहिनूर रुग्णालय.

Web Title: mumbai news women delivery in local train