सुधार मंडळ भ्रष्टाचारातील अधिकाऱ्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - बांधकामांचे बनावट चाचणी प्रमाणपत्र सादर करून देयके मंजूर करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे 56 अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणातील अधिकाऱ्यांना म्हाडाकडून नोटीस बजावण्यात येणार असून, अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी म्हाडाच्या बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेतील कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करत त्यांच्याही चौकशीची मागणी केली आहे.

मंडळामार्फत 2012 मध्ये झालेल्या कामांमधील भ्रष्टाचार भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या निदर्शनास आला. त्यानुसार म्हाडाने तब्बल 37 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले आहे; तसेच मंडळामध्ये कार्यरत असलेल्या 56 अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणामध्ये म्हाडाची आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेली प्रयोगशाळा नामनिराळी राहिल्याने अधिकारी खंत व्यक्त करत आहेत. प्रयोगशाळेत बांधकाम साहित्यांची चाचणी झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते; मात्र अधिकारी हे प्रमाणपत्र देण्यासाठी कंत्राटदारांसोबत हितसंबंध ठेवत होते. त्यामुळे जो कंत्राटदार ठराविक रक्कम देत नाही, त्याची नोंदच प्रयोगशाळेतील नोंदवहीत करण्यात येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रयोगशाळेतील गोंधळाकडे कानाडोळा
सुधारमंडळातील कामांची चाचणी केल्यानंतरही त्यांची नोंद प्रयोगशाळेत झाली नाही. ही बाब भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या निदर्शनात आली असल्याचा दावाही संबंधित अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. सुधारमंडळातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याने म्हाडाच्या प्रयोगशाळेतील कारभाराचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Web Title: mumbai officer notice in coorupted case